भारतीय यात्रेकरूंसाठी यंदा हजयात्रा नाही!

 

 

नवी दिल्ली – भारतातील मुस्लिम हज यात्रेसाठी यावर्षी सौदी अरेबियामध्ये जाणार नाहीत, असे अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी म्हटले आहे. यावर्षी करोनाच्या साथीमुळे हजयात्रेसाठी यात्रेकरूंना पाठवण्यात येऊ नये, असे सौदी अरेबियाच्या राजघराण्याच्यावतीने सांगण्यात आले होते. सौदी अरेबियन सरकारच्या निर्णयाचा आदर करत आणि लोकांचे आरोग्य आणि हित लक्षात घेत भारतातील मुसलमानांना यावर्षी हजसाठी सौदी अरेबियाला न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे नक्‍वी म्हणाले.

या वर्षीची हज यात्रा जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात होणार होती. सौदी अरेबियातील हज आणि उमराह मंत्री मोहम्मद सालेह बिन ताहेर बेन्तेन यांनी सोमवारी रात्री दूरध्वनी करून भारतातील यात्रेकरूंना पाठवले जाऊ नये, असे सुचवले असल्याचे नक्‍वी यांनी सांगितले. दरवर्षीच्या या यात्रेसाठी जगभरातील लाखो मुस्लिम भाविक सौदीमध्ये येत असतात. मात्र यावर्षी सौदीमध्ये पसरलेल्या करोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सौदीमध्ये येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये आधीपासूनच राहत असलेल्या विविध देशांमधील लोकांद्वारेच अत्यंत मर्यादित संख्येने हज यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन करून हज यात्रा सुरक्षितपणे पार पाडली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षीच्या हज यात्रेसाठी देशभरातून 2 लाख 13 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्या सर्वांनी हज यात्रेसाठी भरलेली रक्कम परत देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे, असेही नक्‍वी यांनी सांगितले.

यावर्षी मेहरम (बरोबर पुरुष असल्याशिवाय) हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या 2,300 महिलांनीही अर्ज केले होते. त्यांना आता या वर्षाच्या अर्जांच्या आधारे पुढील वर्षाच्या हज यात्रेला परवानगी दिली जाणार आहे, असेही नक्‍वी यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.