पोर्ट ऑ प्रिन्स (हैती) – हैतीमध्ये ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे अपहरण करणाऱ्या टोळीने तब्बल 17 दशलक्ष डॉलरच्या खंडणीची मागणी केली आहे. मूळ अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या अशा एकूण 17 धर्मोपदेशक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्यात आले आहे.
या प्रत्येक व्यक्तीमागे 10 लाख डॉलरच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. ओलीस ठेवलेल्या या सर्व धर्मोपदेशकांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी सुरू आहेत, असे हैतीचे न्याय मंत्री लिस्झ क्विटेल यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले.
राजधानी पोर्ट ऑ प्रिन्समधून या धर्मोपदेशकांचे गेल्या आठवड्यात 400 मोवोझो नावाच्या गटाने अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांनी भली मोठी खंडणी मागितली असल्याच्या वृत्ताला न्यायमंत्र्यांनी दुजोरा दिला आहे. अपहरणकर्त्यांनी सर्वप्रथम ख्रिश्चन सहाय्य मंत्रालयाशी संपर्क साधला आणि खंडणीची मागणी केली. एफबीआय आणि हैतीचे पोलीस अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करत आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले.
अपहरण करण्यात आलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन ख्रिश्चन सहाय्य मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अपहरण करण्यात आलेल्यांमध्ये अमेरिकेचे 16 आणि कॅनडाच्या एका धर्मोपदेशकाचा समावेश आहे. यामध्ये प्रत्यक्ष धर्मगुरूंशिवाय 6 महिला आणि 5 बालकांचाही समावेश आहे.