हैतीतील भूकंपातील मृतांची संख्या हजाराच्यावर ; शेकडो घरांचे नुकसान

लेस कायेस (हैती) – हैतीमध्ये शनिवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात मरण पावणाऱ्यांची संख्या आता हजाराच्यावर गेली आहे. आतापर्यंत ही संख्या 1,297 इतकी झाली आहे. या भूकंपात शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत आणि मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

हैतीमध्ये जोरदार चक्रिवादळ येण्याची शक्‍यता असल्याने या मदतकार्यात अडथळे येण्याची शक्‍यता आहे. रविवारी झालेल्या भूकंपात किमान 5,700 जण जखमी झाले आहेत.

अनेक घरे मोडकळीस आली असल्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ऑ प्रिन्स प्रांताच्या राजधानीपासून पश्‍चिमेला 125 किलोमीटर अंतरावर होता.
रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने जखमींना दाखल करावे लागल्यामुळे रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

अनेक ठिकाणी अद्याप मदत न पोहोचल्यामुळे नागरिकांना दोन दिवस उघड्यावरच काढावे लागले आहेत.
ग्रेस नावाचे चक्रिवादळ हैतीच्या दिशेने घोंघावू लागले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्‍यता आहे. हे वादळ आज रात्री हैतीमध्ये थडकण्याची शक्‍यता आहे.

या वादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच भूस्खलन आणि पूर येण्याचीही शक्‍यता असल्याचे युस नॅशनल हरिकेन सेंटोरने म्हटले आहे.

एकापाठोपाठ एक आल्या आपत्ती
हैतीचे अध्यक्ष जोव्हेनेल मोस यांची महिन्याभरापूर्वीच काही अज्ञात हल्लेखरांनी घरात घुसून हत्या केली आहे. त्यामुळे देशात राजकीय संकट उभे राहिले होते.

देशामध्ये टोळी युद्ध आणि गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हैतीसारख्या गरीब देशाला करोना साथीविरोधातील लसीसाठी अमेरिकेन मदत केली आहे.

त्यातच भूकंप आणि चक्रिवादळासारख्या नसर्गिक आपत्तींमुळे हैतीतील परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.