पाण्याअभावी फळबागा जळाल्याने शेतकरी हवालदिल

शासनाकडून मदतीची अपेक्षा; जिल्ह्यात फळबागांचे चारशे हेक्‍टर क्षेत्र धोक्‍यात
जयसिंग यादव

नगर – मोठ्या मेहनतीने सांभाळलेल्या फळबागा पाण्याअभावी डोळ्यासमोर जळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मोसंबी, द्राक्ष, डाळींब, केळी, संत्री आदी फळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. सध्या जिल्ह्यात चारशे हेक्‍टर क्षेत्रावरील फळबागा धोक्‍यात आल्या आहे. पाण्याविना या फळबागा जळाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे.

आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अर्थात यंदा पाण्यामुळे फळबागांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणवर घट झाली आहे. त्यात ज्या काही बागा उभ्या आहे. त्या आज पाण्याविना जळाल्या आहेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतू अजूनही कोणतीही मदत मिळालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात फळ लागवड करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना शाश्‍वत व नगरी पीक म्हणून फळबागकडे पाहिले जाते. फळबागांमधून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळालेली आहे. दहा- पंधरा वर्ष अपार मेहनत घेवून लागवड केलेल्या फळबागा उघड्या डोळ्याने जळताना शेतकरी पाहात आहे. टॅंकरने पाणी आणून फळबागा जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आज पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे.

यंदाच्या तीव्र दुष्काळामुळे विहिरी, बोअरवेल, नदी, तलाव, छोटी धरणे कोरडी पडलेली आहेत. जवळपास पाणी शिल्लक न राहिल्यामुळे शेतकरी हताश झाले आहे. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तसेच सन 2018-19 मध्ये राज्य शासनाने सुरु केलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनात जिल्ह्यातील 4 हजार 798 शेतकऱ्यांनी 5 हजार 437.26 हेक्‍टरवर फळबागांचे उद्दिष्टे ठेवले होते. परंतू पाण्याची अवस्था पाहता केवळ 400 हेक्‍टर क्षेत्रात फळबाग लागवड झाली आहे. तीपण आता धोक्‍यात आली आहे.

त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नगर तालुक्‍यामध्ये 472 हेक्‍टरला प्रशासकिय मंजूरी असताना पाणी नसल्याने एकही हेक्‍टर फळबाग लागवड नाही. पारनेरमध्ये 6.20 प्रशासकिय मंजूरी असून 11 लाभार्थ्यांनी सर्वच क्षेत्रावर लागवड केली आहे.पाथर्डी तालुक्‍यातील 61.56 प्रशासकिय मंजुरी असून 23 लाभार्थीने 14.38 हेक्‍टर, कर्जत तालुक्‍यात 150.70 ला प्रशासकिय मंजूरी तर 42 लाभार्थींने 29.45 हेक्‍टर, जामखेडमध्ये 462.10 ला प्रशासकिय मंजूरी असून 16 लाभार्थींने 8.30 हेक्‍टर, श्रीगोंदामध्ये 335.88 ला प्रशासकिय मंजूरी मिळाली असून 28 लाभार्थीने 23.20 हेक्‍टर, श्रीरामपूरमध्ये 58.45 ला प्रशासकिय मंजूरी तर 17 लाभार्थींना 13.10 हेक्‍टर, राहुरीमध्ये 22.30 ला मंजूरी असून लाभार्थींची संख्या शुन्य 0 हेक्‍टर, नेवासामध्ये 209.03 ला मंजूरी असून 78 लाभार्थींना 68.92 हेक्‍टर, शेवगामध्ये 118.15 ला मंजूरी असून 119 लाभार्थींना 98.61 हेक्‍टर, संगमनेरमध्ये 132.79 ला मंजूरी असून 86 लाभार्थींनी 27.85 हेक्‍टर, अकोलेमध्ये 220.45 हेक्‍टरला मंजूरी असून 86 लाभार्थींनी 96.40 हेक्‍टर, कोपरगावमध्ये 173.10 ला प्रशासकिय मंजूरी असून 13 लाभार्थ्यांना 10.40 हेक्‍टर तर राहाता तालुक्‍यामध्ये 155.23 ला प्रशासकिय मंजूरी असताना लाभार्थी 4 जण असून 3.40 हेक्‍टरवर फळबाग लागवड झालेली आहे.

जिल्ह्यात एकूण 2 हजार 577.94 ला प्रशासकिय मंजूरी असून त्यापैकी 473 लाभार्थ्यांनी 400.71 हेक्‍टरवर फळबाग लागवड करण्यात आली. सन 2018-19 मध्ये राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये नगर उपविभागातील नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्‍यामधून 2 हजार 453 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.यामध्ये 129 शेतकऱ्यांच्या अर्जाला प्रशासकिय मंजूरी मिळालेली होती. यामधून 55 शेतकऱ्यांनी 5 हजार 391 हेक्‍टरवर फळबाग लागवड केलेली असून त्यांना 1 लाख 64 हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. नगर उपविभागातील नगर तालुक्‍यातील 17 शेतकऱ्यांनी 20.15 हेक्‍टरवर लागवड केलेली असताना त्यांनी एक रुपयांचेही अनुदान मिळालेले नाही. कर्जत उपविभागातील कर्जत, जामखेड व श्रीगोंदा तालुक्‍यातील 3 हजार 162 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये 430 शेतकऱ्यांनी 252.73 हेक्‍टरला प्रशासकिय मंजूरी मिळालेली होती. यामध्ये 242 शेतकऱ्यांनी 149.68 हेक्‍टरवर फळबाग लागवड केलेली असून त्यांना 32 लाखांचे अनुदान मिळालेले आहे.

श्रीरामपूर उपविभागातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा व शेवगाव तालुक्‍यातील 2 हजार 130 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते. यामध्ये 152 शेतकऱ्यांना प्रशासकिय मंजूरी मिळाली तर 83 शेतकऱ्यांनी 84.97 हेक्‍टरवर फळबाग लागवड केली. या उपविभागतील शेतकऱ्यांना 12 लाख 43 हजारांचे अनुदान प्राप्त झाले. संगमनेर उपविभागतील संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता तालुक्‍यातील 1 हजार 570 शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना 198 शेतकऱ्यांना फळबागांची प्रशासकिय मंजूरी मिळालेली आहे. 45 शेतकऱ्यांनी 34.60 हेक्‍टरवर फळबाग लागवड करुन त्यांना 13 लाख 8 हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये जिल्ह्यातील 9 हजार 315 शेतकऱ्यांनी अर्ज केले असतना फक्‍त 909 शेतकऱ्यांना प्रशासकिय मंजूरी देण्यात आलेले होती. यामध्ये 425 शेतकऱ्यांनी 323.16 हेक्‍टरवर फळबाग लागवड केलेली असून जिल्ह्याला एकूण 59 लाख 15 हजार अनुदान मिळालेले आहे.

सन 2016-17 मध्ये 2 हजार 146.16 हेक्‍टरवर फळबाग लागवड करण्यात आली. 2017-18 मध्ये 2 हजार 267.23 हेक्‍टर तर 2018-19 मध्ये फक्‍त 400.71 हेक्‍टरवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजारो हेक्‍टर क्षेत्रात फळबाग लागवड केलेली होती. त्यामध्ये अनेक फळबाग पाण्याअभावी उध्वस्त झालेल्या असताना या फळबाग लागवड धारक शेतकऱ्यांच्या जळालेल्या फळबागाचे पंचनामे अजूनपर्यंत झालेले नाही. ज्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याबाबत शेतकरी शंका उपस्थित करीत आहेत.

फळबाग लागवडीसाठी सर्व तयारी केलेली होती. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली नाही. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळालेले नाही.

बाळासाहेब नितनवरे, तालुका कृषी अधिकारी, नगर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. निवडणूकीच्या आचारसंहिता असल्यामुळे थोडा विलंब झालेला आहे. याबाबत लवकरच शासनस्तरावर योग्य निर्णय घेऊन फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.

भानुदास बेरड जिल्हाध्यक्ष, भाजप

भाजपचे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. सरकारने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. आघाडीचे सरकार असताना कृषीमंत्री शरद पवार यांनी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत केल्यामुळे अनेक फळबाग वाचल्या. फळबागा उभ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च व मेहनत शेतकरी घेतो. अनेकांचे संसार फळबागावर उभे आहेत. भाजप सरकार फळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत न करताना सत्तेचे राजकारण करीत आहेत.

राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा जळालेल्या आहेत, त्यांना शासनाकडून हेक्‍टरी 18 हजारांचे मदत मिळणार असून प्रत्येक तालुकास्तरावर पंचनाम्याचे कामे सुरु आहेत.

विलास नलगे, कृषी उपसंचालक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.