नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत रविवारी रात्री उशिरापर्यंत इन्काउंटरमध्ये आणखी एका दहशतवाद्यांला ठार करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलाकडून सध्या परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे.
रविवारी कुपवाडामध्ये जवानांनी दोन आणि कुलगामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये मृत्यू झालेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचं नाव शौकत आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांकडून ऑपरेशन ऑलआऊट राबवलं जात आहे. रविवारी सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये आज पुलवामा येथे एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर, रविवारी कुपवाडा येथे दोन दहशतवादी आणि कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
लोलाबच्या जंगलातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी शौकत अहमदच्या जागी पोलिसांनी रविवारी कुपवाडामध्ये शोध मोहीम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत ४ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले चार दहशतवादी जैशसाठी काम करत होते आणि ते पोलिस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये सामील होते.