सध्या तुटवडा : श्वान चावण्याचे प्रमाण वाढल्याने खरेदी अत्यावश्यक
पिंपरी – महापालिका रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीचा खासगी कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार पुरवठा होत नसल्याने आता महापालिकतर्फे हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाकडून थेट पद्धतीने संबंधित लस (व्हायल्स) खरेदी केली जाणार आहे. सुरवातीला तीन महिन्यांसाठी दोन प्रकारच्या एकूण 10 हजार 500 व्हायल्स खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी 24 लाख 25 हजार रुपये इतका खर्च करण्याचे नियोजित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हजारो नागरिकांना कुत्र्यांना चावा घेतला असल्याने रेबीज प्रतिबंधक लस पालिकेच्या दवाखान्यांमध्ये असणे अत्यावश्यक आहे.
महापालिकेचे शहरात 8 रूग्णालये आणि 28 दवाखाने आहेत. संबंधित रुग्णालयांसाठी दोन वर्ष कालावधीसाठी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीसाठी ई-निविदा मागविली होती. रेबीज प्रतिबंधक लस ही आय.एम. किंवा आय.डी. अशा वेगवेगळ्या डोसमध्ये मिळते. श्वानदंश झालेल्या रूग्णांना ही लस दिली जाते. रेबीज प्रतिबंधक लस आय.एम.साठी (1 एमएल) दर प्राप्त झालेला नाही. रेबीज प्रतिबंधक लस आय.डी.साठी (1 एमएल) शशी एंटरप्रायजेस या एकाच निविदाधारकाचा दर प्राप्त झालेला आहे. संबंधित प्रति लससाठी 283.50 रुपये इतका दर आलेला आहे.
महापालिकेची रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये त्याची असलेली आवश्यकता आणि तातडी लक्षात घेता संबंधित दर स्वीकारण्यास तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या औषध निवड समितीने शिफारस केलेली आहे. त्यानुसार शशी एन्टरप्रायजेस यांच्याकडून संबंधित लस खरेदी करण्यासाठी 23 ऑगस्ट 2019 रोजी पुरवठा आदेश देण्यात आलेला आहे. तथापि, संबंधित लस बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा बाजारपेठेत तुटवडा आहे. उत्पादित कंपन्या संबंधित लसीचा महापालिकेला पुरवठा करीत नसल्याने रूग्णालये व दवाखान्यांना मागणीनुसार रेबीज प्रतिबंधक लस पुरविणे महापालिकेला अवघड जात आहे.
बाजारातही संबंधित लसीचा तुटवडा असल्याने महापालिकेने शासकीय संस्था/उत्पादित कंपनी यांच्याकडून थेट पद्धतीने खरेदी करण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळानेच याबाबत पत्रव्यवहार करून संबंधित लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत त्यांच्याकडून 21 नोव्हेंबरला महापालिकेला पत्र मिळाले आहे. तसेच, त्याचे दरही त्यांनी पाठविले आहेत. महापालिका हाफकीनकडून तीन महिन्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लस आय.डी. (1 एमएल) – 6 हजार 500 व्हायल्स आणि रेबीज प्रतिबंधक लस आय.एम. (0.5 एमएल) – 4000 व्हायल्स मागविणार आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या कार्यवाहीला
सुरूवात होईल.
हाफकिनचे दर 66 रूपयांनी कमी
हाफकिनने प्रति व्हायल्ससाठी 231 रूपये इतके दर दिले आहेत. हे दर निविदेतील प्राप्त दरापेक्षा 66.68 रूपयाने कमी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून थेट पद्धतीने ही खरेदी करण्याचे नियोजित आहे. तथापि, तीन महिन्यांच्या व्हायल्ससाठी लागणारी 24 लाख 25 हजार 500 रुपये इतकी रक्कम हाफकिनला पुरवठा होण्यापूर्वीच आगाऊ स्वरूपात द्यावी लागणार आहे. त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी ते पुरवठा करतील.
अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी 14 ऑक्टोंबरला रेबीज प्रतिबंधक लस आय.डी. (1 एमएल) – 25 हजार 170 व्हायल्स तर, रेबीज प्रतिबंधक लस आय.एम. (1 एमएल) – 16 हजार 330 व्हायल्स मिळण्यासाठी मागणी केली होती. महापालिकेच्या रूग्णालयांकडे संबंधित लसीचा वर्षभराचा साठा ठेवण्यासाठी पुरेशी साठा क्षमता उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षभरासाठी थेट पद्धतीने दर तीन-तीन महिन्यांच्या टप्प्याने ही खरेदी केली जाणार आहे. दरम्यानच्या कालावधीत आवश्यकता असल्यासच निविदेतील पुरवठाधारकाकडून लस खरेदी करण्यात येईल.