लाहोर – मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईदच्या जमात-उद-दावा या दहशतवादी गटाचा प्रवक्ता याह्या मुजाहिद याला पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याह्या मुजाहिद व्यतिरिक्त जमात-उद-दावाच्या अन्य दोघा म्होरक्यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने टेरर फंडिंगच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे. त्यामध्ये हाफिझ सईदच्या मेव्हण्याचाही समावेश आहे.
दहशतवाद विरोधी न्यायालय अर्थात “एटीसी’चे न्यायाधीश इजाझ अहमद बट्टर यांनी जेयुडीचा प्रवक्ता याह्या मुजाहिद याच्या विरोधातील दोन एफआयआरप्रकरणी 32 वर्षांची शिक्षा सुनावली. तर प्रो. झफर इक्बाल आणि हाफिझ सईदचा मेव्हणा प्रो. हाफिझ अब्दुल रेहमान मक्की यांना टेरर फंडिंगच्या दोन प्रक्रणांमध्ये 16 वर्षे आणि 1 वर्षाची शिक्षा सुनावली.
“जेयुडी’चे नेते अब्दुल सलाम बिन मुहम्मद आणि लुगमान शाह यांनाही टेरर फंडिंगच्या प्रकरणांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणातील साक्षीदारांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. कडेकोट बंदोबस्तात या संशयितांना आज न्यायालयात आणण्यात आले.
गेल्याच आठवड्यात लाहोरमधील “एटीएस’ने “जेयुडी’च्या हाफिझ रेहमान मक्की, झफर इक्बाल आणि मुहम्मद अशर्रफ यांना पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने दाखल केलेल्या टेरर फंडिंगच्या अन्य दोन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सईदला लाहोरमधील “एटीसी’ने दहशतवादी वित्तपुरवठा आरोपात 11 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.