मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद होणार गजाआड?

पाकिस्तानमधील पोलीस लवकरच करणार कारवाई

लाहोर -मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार हाफिज सईद गजाआड होण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानमधील पोलीस लवकरच त्याला अटक करतील, असे संकेत मिळत आहेत.

जमात-उद्‌-दावाचा (जेयूडी) प्रमुख सईद आणि त्या संघटनेतील त्याच्या 12 साथीदारांविरोधात बुधवारी 23 गुन्हे दाखल करण्यात आले. दहशतवादासाठी पैसा पुरवत (टेरर फायनान्सिंग) असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी ती कारवाई केली. गुन्हे दाखल झाल्याने आता सईद आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पंजाब प्रांताचे पोलीस पाऊले उचलणार आहेत. सईद लाहोरमधील त्याच्या घरातच राहत आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारकडूून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सईदला अटक केली जाईल, असे समजते. दहशतवादाविरोधात पाऊले उचलण्याची ग्वाही आंतरराष्ट्रीय समुदायाला दिली असल्याने इम्रान सरकार सईदवरील पुढील कारवाईसाठी परवानगी देईल, असे निश्‍चित मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने डोळे वटारल्यामुळे तंतरलेल्या पाकिस्तानने आता दहशतवादी म्होरक्‍यांवर कारवाई करण्याचे मन बनवल्याचे मानले जात आहे. सईदविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांकडे त्यादृष्टीनेच पाहिले जात आहे.

सईद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. तोयबाने 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ले (26/11) घडवले. स्वत:च्या कारवायांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी त्याने समाजसेवेचा बहाणा करून जेयूडीची स्थापना केली. मात्र, जेयूडीला मिळणारा पैसा तो दहशतवादासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.