कराची – मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणाची सुनावणी आजच पूर्ण झाली. त्यानंतर टेरर फंडींग अर्थात दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पंजाब न्यायालयाने हाफिज सईदला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असून त्याला 1 लाख 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच त्याची सर्व मालमत्ता जप्त (सिझ) करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सईदचे दोन साथीदार जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद या दोघांनाही साडेदहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून अब्दुल रहमान मक्वी याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा पंजाब न्यायालयाने सुनावली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच हाफीज सईदला फरार दहशतवादी घोषित करुन त्याच्यावर एक कोटी डॉलर्सचे इनाम लावले होते. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या दोन प्रकरणांत हाफिज सईदला गेल्या वर्षी 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये त्याला 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो लाहोरच्या लखपत कारावासात बंदीवान आहे. या तुरुंगाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.