हडपसर – देशातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पुर्णाकृती शिल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१७) ऑगस्ट रोजी होणार आहे. हडपसरमधील श्रीराम चौक हांडेवाडी रोड येथे सायंकाळी सहा वाजता हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सोहळ्याचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली.
येथील श्रीराम चौकात सार्वजनिक ठिकाणी उभारलेले हे भारतातील पहिलेच पुर्णाकृती शिल्प आहे. सन २०१८पासून विविध शासकीय विभागाच्या परवानग्या घेत हे शिल्प स्वखर्चातून उभारले गेले आहे. गेल्या वर्षभरापासून शिल्पाची उभारणी सुरु केली होती. जनभावना आणि स्वत:ची श्रीरामभक्ती लक्षात घेत प्रभू श्रीराम यांच्या शिल्पनिर्मितीचा निर्णय घेतला, अशी भावना नाना भानगिरे यांनी व्यक्त केली.
या शिल्पामुळे परिसरातील राम भक्तांना पुणे शहरातील तमाम हिंदू बांधवांना प्रभू श्रीरामाचे दर्शन करता यावे ही एकमेव सदिच्छा या शिल्प उभारणीमागे असल्याचेही भानगिरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याला, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, शिवसेना नेत्या विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेश समन्वयक खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानसभेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे म्हाडा अध्यक्ष तथा मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, हडपसरचे आमदार चेतन तूपे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, उद्योजक पुनित बालन, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त पुणे अमितेश कुमार आदींसह, हिंदू धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सन २०१८ पासून विविध विभागांच्या परवानगी घेवून स्वखर्चाने हे शिल्प उभारले असून श्रीराम भक्तांना हे शिल्पऊर्जास्रोत ठरेल. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, मर्यादा पुरषोत्तम प्रभु श्रीरामांच्या भारतातील पहिल्या सार्वजनिक शिल्पाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित रहावे. – प्रमोदनाना भानगिरे, शहर प्रमुख, शिवसेना पुणे शहर