पुणे – मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत आणि चर्चेत असणाऱ्या हडपसर टर्मिनसचे काम 2021 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली.
रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शर्मा यांनी लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेतला.
रेल्वेने लॉकडाऊनमध्ये गरजूंना फूड पॅकेटचे वितरण केले, आरपीएफ कर्मचाऱ्यांनी मास्क आणि फेसशिल्ड तयार केले, करोनाच्या अनुषंगाने स्थानकावरदेखील सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यात येत आहे, मालवाहतुकीच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी विभागीयस्तरावर बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स काम करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
हडपसर टर्मिनसच्या भूसंपादनाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने कामाला वेळ लागत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टर्मिनसचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.