हडपसर (प्रतिनिधी) – झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत हडपसर- रामटेकडी सर्व्हे नंबर 110 येथे निवासी प्रकल्प उभा आहे. मात्र, येथील एका पात्र बिगर निवासी दुकानदाराला विकसक यांच्याकडून अद्यापही दुकान मिळाले नाही. गेली दहा वर्षांपासून पात्र दुकानदार त्याचा पाठपुरावा करत आहे. प्रशासन आणि विकसक आपल्याला कधीतरी दुकान देतील या आशेने गेली दहा वर्षांपासून ते हेलपाटे घालत आहेत.
येथील काशिनाथ भिवा कुचेकर यांचे के.के. कँडल हे मेणबत्तीचे दुकान रामटेकडी सर्व्हे नंबर 110 येथे होते. सन 1997 पासून ते येथे मेणबत्ती विकण्याचा व्यवसाय करत होते. दरम्यान येथील जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला.त्यात कुचेकर यांच्यासह अन्य दहा ते बारा जणांची दुकाने हटवण्यात आली.
त्यावेळी दुकानाचे पुनर्वसन करून पक्की दुकाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या पक्क्या दुकानासाठी सन 2000 ला काशिनाथ कुचेकर हे पात्रही ठरले आहेत. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी विकसक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.मात्र, तब्बल दहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कुचेकर यांना त्यांच्या हक्काचे पक्के दुकान मिळाले नाही.
“रामटेकडी सर्व्हे नंबर 110 येथे माझे दुकान होते. ते पाडण्यात आले. पक्के दुकान देण्याचे आश्वासन विकसकाने दिले होते. त्यासाठी मी पात्रही ठरलो आहे. परंतु अद्यापही दुकान किंवा त्याचे भाडे देण्यात आले नाही. याशिवाय संक्रमण शिबिराचा गाळाही अद्यापही देण्यात आला नाही.वय होत आले असून आता दुकान कधी मिळेल आणि व्यवसाय कधी करायचा हा मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा आहे.
– काशिनाथ कुचेकर (रामटेकडी- हडपसर)
याशिवाय पात्र दिनांकापासून या बिगर निवासी दुकानाचे भाडेही देण्यात आले नाही. आपल्याला न्याय मिळेल या आशेने आजवर विकसक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे घालावे लागत आहे. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही डिसेंबर 2020मध्ये पत्रव्यवहार करून थकीत भाडे व बिगर निवासी दुकान मिळावे, अशी मागणी काशिनाथ कुचेकर यांनी केली आहे.