रुमानियन हॅकर्सना कोल्हापुरात अटक; कॉसमॉस बँक लुटमार प्रकरण उघडकीस येणाची शक्यता

दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना कोल्हापुरात अटक ; गोव्यामध्ये एटीएम मशीनला स्कीमर बसवून ग्राहकांचे पैसे लुटले
कोल्हापूर / प्रतिनिधी  : एटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यांवरील आॅनलाईन सिस्टीम हॅक करून त्यावरून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या दोघा रुमानियन परदेशी हॅकर्सना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शिताफीने अटक केली. संशयित आरोपी पीरजोल एमनॉईल (वय ४०), सिपोस वासिले लॉर्डियन (३७) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी गोवाराज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दिवसात चार एटीएम मशीनवरून आॅनलाईनद्वारे रोकड लुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
तेथून हे दोघे पोलिसांना चकवा देऊन कोल्हापूरला पळून आले होते. ते येथील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी आतापर्यंत सात ठिकाणांहून एटीएमद्वारे ग्राहकांचे पैसे परस्पर काढून घेतल्याची कबुली दिली आहे. या दोघांच्या ताब्यातून कार, रोख ७ लाख १८ हजार ५४० रुपये, दोन लॅपटॉप, पाच मोबाईल, सात एटीएम कार्डे, अमेरिका, इंग्लंड, मोरोक्को, रुमानिया, आदी देशांच्या चलनी नोटा, नाणी व पासपोर्ट असा सुमारे २० लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना पुढील तपासासाठी शनिवारी सकाळी गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. परदेशी हॅकर्सचे मोठे रॅकेट असून या दोघांच्या चौकशीमध्ये त्याचा पदार्फाश होणार आहे.
अधिक माहिती अशी, गोवा राज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २७ सप्टेंबर रोजी एटीएम मशीनला स्कीमर बसवून बॅँकेतील ग्राहकांच्या खात्यांवरील रोकड आॅनलाईनद्वारे परस्पर लुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने गोवा पोलीस चक्रावून गेले. २८ स्पटेंबरला पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर धातकर हे रात्रगस्तीवर फिरत असताना त्यांना खेणीर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये एक विदेशी नागरिक काहीतरी करीत असल्याचे दिसून आले. बाहेर लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये दुसरा विदेशी नागरिक बसलेला दिसून आला.
त्यांचा संशय आल्याने धातकर गाडीतून उतरत असताना पोलिसांची चाहूल लागताच एटीएममधील विदेशी नागरिक धावत कारमध्ये बसून दोघे भरधाव वेगाने निघून गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते सापडले नाहीत. त्यांनी तत्काळ गोवा पोलीस नियंत्रण कक्षातून ही माहिती पुणे, मुंबई एअरपोर्टवर कळविली. दोघे परदेशी नागरिक पुणे-मुंबईला न जाता गगनबावडामार्गे कोल्हापूरला आले. पोलिसांनी कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेऊन संशयितांचे मोबाईल नंबर मिळविले. सायबर क्राईमवरून त्यांचे लोकेशन तपासले असता ते कोल्हापुरातील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याचे दिसून आले. त्यानुसार गोव्याचे पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज व फोटो पाठवून कोल्हापूर पोलिसांना सावध केले.
सर्वत्र नाकाबंदी
शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी नियंत्रण कक्षामधून शहर आणि महामार्ग परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना संदेश पाठवून नाकाबंदीचे आदेश दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उतरलेल्या दोघा परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते रुमानियन नागरिक असल्याचे समजले. दोघांनाही त्यांच्या खोलीमधून ताब्यात घेतले. या दोघा संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
कॉसमॉस बँकेच्या लूटमारीची चौकशी
कॉसमॉस बँकेच्या लूटमारीची चौकशी राज्यातील कॉसमॉस बॅँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी ९४ कोटी रुपये काढले होते. बॅँकेच्या प्रशासनाने पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापुरातील कॉसमॉस बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेतूनही अशाच प्रकारे पैसे उचलले असल्याचे पत्र पुणे सायबर विभागाला प्राप्त झाले आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आॅनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पुणे पोलीस या रुमानियन परदेशी हॅकर्सना चौकशीसाठी ताब्यात घेणार असलेचे समजते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)