पुणे – केंद्र शासनाच्या स्टार्स प्रकल्पा अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हॅकाथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून किमान १ हजार विद्यार्थी नोंदणी होणे अपेक्षित आहे.
या उपक्रमांतर्गत १५ विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाकडून https://maa.ac.in/SCERTMahaHackathon ही नोंदणी लिंक देण्यात आली आहे. ही लिंक १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यी नोंदणीसाठी खुली राहणार असून शिक्षकांनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे. उपक्रमासंदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.