2016-17 पूूर्वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जुन्या अभ्यासक्रमाचे विषय घेऊन द्या परीक्षा; पदवीही मिळणार

पुणे – विद्यार्थ्यांना मुदतीत उच्च शिक्षण, अथवा पदवी अथवा पदव्युत्तरचा एखादा विषय किंवा वर्ष पूर्ण करता आले नाही, अशांना शिक्षण पूर्ण करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2016-17 पूूर्वीचे विद्यार्थी आताच्या अभ्यासक्रमाचे विषय घेऊन त्याची परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पदवीही प्राप्त मिळणार आहे.

काही विद्यार्थ्यांना आर्थिक-कौटुंबिक, शारीरिक अडचणींमुळे उच्च शिक्षण अर्धवट सोडावे लागते. राहिलेले शिक्षण पूर्ण करायची इच्छा झाल्यास तोपर्यंत अभ्यासक्रम बदललेला असतो. त्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची मुभा नसल्याने अनेकांना पदवीपासून वंचित राहावे लागते. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना आता त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यापीठांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या होत्या.

देशात सुमारे पाच टक्‍क्‍यांच्या आसपास विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातात. आता या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्याचे मानसिक समाधान, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. नव्या शैक्षणिक धोरणातही “मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्‍झिट’ची सुविधा देण्यात आली आहेत. त्या धर्तीवरच जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात येता येईल. पुणे विद्यापीठाच्या आगामी सत्र परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पुणे विद्यापीठाने म्हटले आहे.

असा आहे नियम
विद्यापीठाच्या विद्या परिषदेने जुन्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन पदवी मिळवण्याची सुविधा प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमांत बदलही करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2016-17 पूर्वीच्या जुन्या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. संबंधित जुन्या विद्यार्थ्यांना सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विषय घेऊन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.