वॉशिंग्टन : अमेरिकेत “एच 1-बी’ व्हिसा आणि ग्रीनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना आणि या व्हिसासाठी काही कागदपत्रे सादर करण्याची नोटीस ज्यांना दिली गेली आहे, अशांना अमेरिकेच्या प्रशासनाने करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
“यूएस सिटिझनशीप ऍन्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. “एच 1-बी’ व्हिसा आणि ग्रीनकार्डबाबतच्या प्रक्रियेसाठी काही कागदपत्रांची पूर्तता शिल्लक राहिली असेल, अथवा काही प्रक्रियेच्या पूर्ततेचा कालावधी संपला किंवा संपत आला असेल, तर त्या सर्वांना या मुदतवाढीचा फायदा मिळू शकणार आहे.
या संदर्भातील अर्जांना आणखी 60 दिवसांमध्ये जरी प्रतिसाद दिला, तरी त्याचा विचार केला जाणार आहे, असे “यूएससीआयएस’ने म्हटले आहे. सध्याच्या कालावधीमध्ये जे लोक रहिवासी इमिग्रेशनसाठी प्रयत्न करत असतील त्यांना मर्यादित ठेवून अमेरिकेत कामासाठी येणाऱ्यांना मर्यादित प्रवेश देण्याचेच धोरण अमेरिकेने स्वीकारले आहे. मात्र, आता हे धोरण शिथिल करण्याने अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना त्याचा लाभ होणार आहे.