पुणे – करोनावर मात करण्यासाठी तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लस बाजारात आली आणि लसीकरणाला सुरवात झाली. ही लस लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना देण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, काही देशांमध्ये या गटाला लस दिली जात असून, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे भारतातही गर्भवती आणि स्तनदा मातांचे लसीकरण व्हावे, अशी मागणी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून होत आहे.
मार्च 2020 पासून महाराष्ट्रासह भारतात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. त्यामध्ये सर्वच वयोगटातील व्यक्तीचा समावेश आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली, त्यांना धोका कमी आणि ज्याची प्रतिकार शक्ती कमी, त्यांना करोनाचा धोका अधिक असे तज्ज्ञांकडून बोलले जाते. त्यामुळे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.
दरम्यान, “करोना काळात गर्भवती महिला व स्तनदा मातांनी कशी काळजी घेतली पाहिजे’ याबाबत डॉ. गायत्री व्यंकटरमन यांच्याशी चर्चा केली. “गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे एखादा बाधित व्यक्ती त्याच्या संपर्कात आला, तर त्या महिलेला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यानंतर औषधोपचार करण्यास मर्यादा येतात. त्यांना आणि बाळाला त्रास होणार नाही अशीच औषधे द्यावी लावतात.
त्यामुळे “घरी रहा, सुरक्षित राहा’ याप्रमाणे महिलांनी घराबाहेर पडू नये. बाहेर पडणे अत्यंत आवश्यक असेल तर मास्क लावणे आवश्यक असून, सहा फुटांपेक्षा जास्त अंतर राहील याची काळजी घ्यावी. तर लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,’ असे आवाहन डॉ. गायत्री व्यंकटरमन यांनी केले आहे.
अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये गर्भवतींना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्याचा परिणामही चांगला दिसून आला. त्यामुळे भारतातील गर्भवतींनाही लसीकरणास परवानगी मिळावी, अशी मागणी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील गायनाकोलॉजिस्ट असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली आहे.
– डॉ. गायत्री व्यंकटरमन, स्त्री रोगतज्ज्ञ
प्रेग्नेंसीमध्ये पाहिले तीन महिन्यांत बाळाची वाढ बऱ्यापैकी झालेली असते. त्यामुळे सुरुवातीच्या तीन महिन्यांत सर्व औषधे देणे टाळले जातात. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांत लस घेऊ नये. त्यानंतर कोविड कॉम्प्लिकेशनची रिस्क पाहता, लस घेतलेले केव्हाही चांगले. त्यामुळे बाळाला तेवढा धोका नसतो. याबाबत अद्याप अभ्यास पूर्ण झालेला नाही. परंतु लसीमुळे होणारा धोका अगदीच नगण्य असून, रिस्कपेक्षा बेनिफिट अधिक असल्यामुळे ही लस द्यावी, असे सगळ्यांचे मत आहे.
– डॉ. डी. बी. कदम, प्रमुख, कोविड टास्क फोर्स, पुणे