विज्ञानविश्‍व: जिमनॅस्ट रोबोट्‌स

डॉ. मेघश्री दळवी

बोस्टन डायनॅमिक्‍स ही रोबोटिक्‍समधली वैशिष्ट्यपूर्ण कंपनी. उड्या मारणारा ऍटलस रोबोट, माणसासारखा लीलया दरवाजा उघडून धरणारा स्पॉट रोबोट, एकूणच रोबोट्‌सकडून ही कंपनी तऱ्हेतऱ्हेचे अचाट प्रकार करून घेत असते. ऍटलस रोबोट्‌सचे भरपूर व्हिडिओ यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहेत. कधी तो गवताळ किंवा बर्फाळ प्रदेशातून चालतो आहे, तर कधी चक्‍क मारामारी करतो आहे!

यातला मनोरंजनाचा भाग सोडला, तर रोबोट्‌सना माणसाच्या किती जवळ नेता येईल याचे बोस्टन डायनॅमिक्‍समध्ये सतत प्रयत्न सुरू असतात. मागे गुगलने ही कंपनी विकत घेतली, आणि अलीकडे जपानच्या सॉफ्टबॅंकेला विकली. जपानमधील रोबोट्‌सची क्रेझ पाहता हे प्रयोग आता वाढणार हे निश्‍चित. ऍटलस सामानाची वर्गवारी करत वाकून खोके उचलतो आहे आणि योग्य त्या जागी ठेवतो आहे, हे पाहताना आपण रोबोट बघतो आहे की खुद्द माणूस इतका अचंबा वाटतो. नुकताच ऍटलस रोबोट जिम्नॅस्टिक्‍स करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात तो सॉमरसॉल्ट मारताना दिसत आहे. ऍटलसचं हे कसब पाहून अक्षरश: थक्‍क व्हायला होतं.

दुसरीकडे स्पॉट हा रोबोट नृत्य करायला शिकतो आहे. पाळीव कुत्र्याची जागा घेऊ शकेल अशा प्रकारे स्पॉटची रचना आहे. स्पॉट हे नाव देखील पाश्‍चात्य जगात प्रसिद्ध अशा बालकथांमधल्या एका गोड पिल्लाचं. लांबुळकं शरीर, लवचिक चार पाय आणि काही वेळा डोक्‍याच्या जागी एक क्रेनसारखा हात या जोरावर स्पॉट बऱ्याच करामती करू शकतो. अतिशय सफाईने हॅंडल फिरवून स्पॉट दरवाजा उघडू शकतो. वेगाने धावू शकतो. आता तर एका वेळी एक पाय उचलून तो नाचूदेखील शकतो.

रोबोट्‌सकडून जिम्नॅस्टिक्‍स किंवा नृत्य कशाला करून घ्यायचे हा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण याच कौशल्याचा वापर करून हे रोबोट्‌स खडकाळ ठिकाणी चालू शकतात. कुठेतरी अवघड जागी अडकलेल्यांची सुटका करायची असेल, तर हे कसब उपयोगी येतं. जड सामान उचलताना तोल सांभाळता येत असेल, तर हे रोबोट्‌स आगीतून माणसांना आणि मूल्यवान वस्तूंना उचलून आणू शकतात. माणसासारखे दिसणारे आणि माणसासारखेच हालचाल करू शकणारे रोबोट्‌स उद्या माणसांना सोबत करणार आहेत. त्यावेळी अशा हुबेहूब आणि काटेकोर हालचाली महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी बोस्टन डायनॅमिक्‍सच्या या प्रयोगांचं महत्त्व.

आज स्पॉट काही वेळा बांधकामाच्या जागी देखरेख करताना दिसतो. गॅस पाइपची जोडणी सुरू असताना तिथे सुरक्षेची चाचणी करताना दिसतो. धोकादायक ठिकाणी चपळाईने काम उरकताना दिसतो. त्यामागे संशोधकांचे हे श्रम आहेत. स्पॉटची मागणी वाढत आहे आणि त्यानुसार संशोधकांचा उत्साहदेखील वाढत आहे. जिम्नॅस्टऍटलस रोबोट अजून बाजारात उपलब्ध नाही, पण त्याची प्रसिद्धी पाहता तोही लवकरच जागोजागी काम करताना दिसेल यात शंका नाही!

Leave A Reply

Your email address will not be published.