नवी दिल्ली- ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. त्यानंतर मशिदीतील सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे त्या भागाची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाने यासंदर्भात वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, मुस्लिम कोणत्याही अडथळ्याशिवाय ज्ञानवापी मशिदीत नमाज अदा करू शकतात. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या हिंदू भाविकांना नोटीस बजावली आहे. आता मशीद कमिटीच्या याचिकेवर सुनावणीसाठी 19 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी वाराणसी जिल्ह्यातील न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलाचा भाग सील करण्याचे निर्देश दिले होते, जेथे शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी, ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे त्या ठिकाणी लोकांना प्रवेश करण्यास मनाई करावी आणि मशिदीमध्ये केवळ 20 लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
प्रत्यक्षात 14 ते 16 मे दरम्यान ज्ञानवापी मशीद संकुलाच्या सर्वेक्षणाचे काम झाले होते. यादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने नमाज अदा करणाऱ्यांची संख्या मर्यादित केली होती.
त्याचवेळी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ज्ञानवापी मशीद व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ट्रायल कोर्टाला सुनावणीपासून रोखण्याची मागणीही व्यवस्थापनाने केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या खटल्याला स्थगिती दिलेली नाही.