मेरठ – भाजपचे माजी आमदार संगीत सोम यांचे वादग्रस्त विधान पुन्हा एकदा समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी ज्वालागढ येथील महाराणा प्रताप चौकात एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ज्ञानवापी मशिदीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. संगीत सोमचे हे वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते ज्ञानवापी मशीद पाडण्याबाबत बोलताना ऐकू येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये संगीत सोमने 1992 मधील बाबरी मशिदीप्रमाणे 2022 मध्ये ज्ञानवापी मशीद पाडणार असल्याचे कथितपणे सांगितले आहे.
संगीत सोम व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, ‘1992 साली ज्या दिवशी एक मशीद पाडली गेली होती, तेंव्हा त्यांनी देश कुठे चालला आहे हे समजून घेतले पाहिजे होते. ही मशीद कारसेवकांनी पाडली हे समजून घ्यायला हवे होते. आता हिंदुस्तान अशी एकही मशीद सोडणार नाही भाऊ., असे सोम म्हणाले.
संगीत सोम पुढे म्हणाले की, मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशीदी बांधल्या होत्या. त्या आता परत घेण्याची वेळ आली आहे. याशिवाय बनारसमध्ये भगवान काशिनाथाचे मंदिर बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रामलला अनेक वर्षे ताडपत्रीत राहिले. आता ते भव्य इमारतीत येत आहेत. ज्ञानवापी मशीद पाडून भगवान भोलेनाथांचे कुटुंबाचे स्थलांतर करून संपूर्ण मंदिर बांधले जाणार आहे, असे सोम म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणानंतर गोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षणाला सुरुवात झाली, मात्र पहिल्या दिवशी शुक्रवारी सर्वेक्षण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाहणी पथक मशिदीच्या आत गेल्याने चांगलाच गोंधळ उडाला. पाहणीदरम्यान पाहणी पथक आणि व्हिडीओग्राफी टीम आधीच मशिदीच्या बाहेर पोहोचली होती, मात्र मोठ्या विरोधानंतर टीम आत जाऊ शकली नाही. आंदोलनानंतर हे प्रकरण सतत चर्चेत आहे.