आमचे आर्थिक प्रश्न एव्हरेस्टइतकेच दुर्लघ्य!
नवी दिल्ली, ता. 16 – आज अ. भा. कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत भाषण करताना इंदिरा गांधी म्हणाल्या, भारतातील लोकांपुढे त्यांच्या दारातच अनेक अडचणींचे डोंगर उभे असतात अगदी “एव्हरेस्ट’ एवढेच ते दुर्लघ्य असतात.
गंमत पहा की, श्रीमंत देशातले लोक येथे येतात व एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न करतात. कारण ते सुखासीन समाजात राहतात. परंतु भारतातील लोकांपुढे आर्थिक प्रश्न दर पावलागणिक उभे असतात.
यंत्रे माणसाला “खात’ आहेत
बंगलोर – मानवी क्रियांची जागा संपूर्णपणे यांत्रिक क्रियांना दिली जाऊ नये, प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवाचे मनुष्यपण कमी होत आहे. साधने ही मानवालाही हत्यारे म्हणूनच राहिली पाहिजेत, असे उद्गार उपराष्ट्रपती जी. एस. पाठक यांनी काल येथे काढले.
10 रुपयांपासूनच्या सर्व भारी नोटा रद्द करा
नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री मनुभाई शहा यांनी येथे अशी सूचना केली की, भारी किमतीच्या नोटा रद्द कराव्यात. त्यात 10 रुपयांच्या नोटांचाही समावेश असावा.
एकाच गीताचे पंधरा भाषेत गायन!
नवी दिल्ली – आज सकाळी अ. भा. कॉंग्रेस कमिटीची बैठक सुरू झाली त्यावेळी सुब्बा राव यांनी “हम भारत के संतान’ हे गाणे 15 भाषांमध्ये गाऊन दाखविले. त्यानंतर त्यांनी संस्कृतमध्येही तेच गीत गाऊन दाखविले. यावेळी प्रत्येक भाषेच्या प्रतिनिधीने सुब्बा राव यांचे कौतुक केले.
पाकिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी नवे कर
रावळपिंडी – पाकिस्तानात अलिकडे आलेल्या महापुरानंतर पाकिस्तानची पुनर्बांधणी करण्यासाठी नवे कर लादण्यात येतील, असे पंतप्रधान झेड. ए. भुट्टो यांनी आज म्हटले.