ज्ञानदीप लावू जगी : परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणे न वचेचि वाया ।

श्री रविदासजी महाराज शिरसाठ, आळंदी
परमाणूंचिया मांदिया । पृथ्वीपणे न वचेचि वाया । तेवि विश्वस्फूर्ति इया । झाकवेना जो ।।6।।
परमाणु हा पृथ्वीतत्त्वाचा अति सूक्ष्मतम भाग. आकारमानाच्या दृष्टीने तो एवढा सूक्ष्म असला तरी, तो पृथ्वीचाच एक अंश असल्याने त्याच्या ठिकाणी “पृथ्वीत्त्व’ ही जाती असणारच.
भलेही हे परमाणु वाऱ्यामुळे आकाशाला भिडले तरी त्यांच्याठिकाणी असणारा पृथ्वीपणा नष्ट होत नाही. “का पवने परमाणु उचलले। ते पृथ्वीपणावेगळे नाही केले।’ असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे.
तसेच परमाणु पृथ्वीरूपच असल्याचा निर्वाळाही माऊलींनी दिला आहे. “कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा। तरी भूगोलचि काखे सुवावा।’ म्हणूृन पृथ्वीवर परमाणुंचे असे अनेक समुदाय असतानाही त्यामुळे पृथ्वी झाकली जात नाही. त्याप्रमाणे विश्व हे परमात्मरूपच असल्यामुळे विश्वरूप स्फुरणाने (म्हणजेच विश्वनिर्मितीमुळे) ते परमतत्त्व झाकले जाणार नाही.
म्हणूनच “जालेनि जगे मी झाके। तरी जगत्वे कोण फाके। किळेवरी माणिके। लोपिजे काई ।।’ असा मार्मिक प्रश्न ज्ञानोबाराय विचारताना दिसतात.
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 7)





