पुण्यातील गुटखाकिंगचे हवाला रॅकेट उद्‌ध्वस्त

पुणे – गुटख्याच्या व्यापारातून बेकायदा कमाई केलेली लाखो रुपयांची रक्कम अन्य ठिकाणी पाठवणारे हवाला रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या प्रकरणात नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यातून पुण्यात नव्याने बोकाळलेल्या काळ्या धंद्यांवर प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे. हा पैसा कोठे पाठवला जात असे, याचा तपास सुरू असला तरी तो गुन्हेगारी टोळ्यांना दिला जात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 


पुणे पोलिसांनी दगडूशेठ गणपती मंदिरासमोरीलच एका इमारतीवर छापा टाकला. यावेळी सुमारे पावणेदोन कोटीची रोकड जप्त केली. विशेष म्हणजे, हे रॅकेट परिमंडळ पोलीस उपायुक्त -1, फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चालवले जात होते. गुटखाच्या बेकायदा विक्रीतून मिळालेली रक्कम ही रोकड असल्याचे समजते.

 


पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रजनीश निर्मल आणि सहायक निरीक्षक अभिजित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाने बुधवारी पेठेतील अंतर्गत इमारतीतील दोन कार्यालयांवर छापे टाकले.  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईचे आदेश दिले होते. यामध्ये हवाला रॅकेटमधील शहरातील दोन बडी आसामी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

 

नारनवरे यांनी दैनिकप्रभात’ला सांगितले की, ही पुणे शहर गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. आम्हाला अशी माहिती मिळाली की, या रॅकेटमागील काही माणसे बेकायदा रोख रकमेचा संग्रह करत होते. ही रोकड ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बेकायदा पोहचवत होते. हवाला रॅकेट गुटखाच्या बेकायदा पुरवठादारांशी जोडला गेला होता. आम्ही एकाच वेळी चार कार्यालयांवर छापे टाकले आणि नऊ जणांना ताब्यात घेतले. अंदाजे पावणे दोन जप्त केली आहे. तथापि, जप्त केलेल्या रोख रकमेची मोजणी करण्याचे काम अद्याप सुरु आहे.

 


पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘नोव्हेंबर महिन्यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला हडपसरजवळ लोणी काळभोर येथील नवनाथ काळभोर याच्याकडे मोठ्या प्रमाणात पॅक केलेला गुटखा सापडला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुटखा पुरवठा करणाऱ्या काळभोरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काळभोर यांच्या चौकशीत गुटख्याच्या अवैध व्यापारातून रोख रकमेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. हा पैसा पुण्याहून हवाला रॅकेटमार्गे अन्य शहरात हलविण्यात येत होता. रॅकेटची यंत्रणा संपूर्ण शहर आणि जिल्हयात पसरली आहे. रोकड पैशाचा माग कुठून निघाला आहे याची पोलिस चौकशी करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.