नारायणगाव – येथील अवैध गुटखा प्रकरणात सहभागी असलेला शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किशोर ज्ञानदेव धवडे याला रविवारी (दि. 12) बडतर्फ केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील आळेफाटा येथील गुटखा विक्रेता इरफान हमीद मोमीन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी 30 हजारांच्या गुटख्यासह 3 लाख 50 हजार किमतीची स्विफ्ट कारसह एकूण 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस हवालदार किशोर धवडे (शिरूर पोलीस स्टेशन) व हनिफ तांबोळी (रा. शिरूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मांजरवाडी हद्दीत नाकाबंदी करताना जाधववाडी बाजूकडून लाल रंगाची नंबर प्लेटची स्विफ्ट कार येताना दिसली.
कारमध्ये वर्दीतील पोलीस व त्याच्याशेजारी मौलाना बसलेला दिसला. त्यांनी “आम्ही जेवणासाठी चाललो आहे,’ असे सांगितले व ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले. ते जाताना मौलाना यांच्याकडे पोलीस पाटील यांनी पहिले असता त्यांना संशय आला.
पोलीस पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना ही माहिती दिली. त्यानंतर पुन्हा शनिवारी (दि.11) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास स्विफ्ट गाडी नारायणगाव बाजूने जोरात येताना दिसली. ती गाडी नारायणगावहून मांजरवाडीमार्गे शिरूरकडे जाताना मांजरवाडी येथे नाकाबंदीदरम्यान गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता हवालदार किशोर धवडे याने गाडी जोराने चालवत जाधववाडी बाजूच्या रस्त्याने निघून गेली.
यावर सचिन टाव्हरे यांनी तत्काळ पुढे काही ग्रामस्थांना मोबाइलवरून माहिती देऊन गाडीचा पाठलाग सुरू केला असता, ग्रामस्थांनी अखेर गाडीवर काठ्यांनी प्रहार करून कार थांबवली. दरम्यान, पोलीस स्वप्नील लोहार, सातपुते, शेख यांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली.