- दोघांना अटक
- हिंजवडी पोलिसांची कामगिरी
पिंपरी – गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा तसेच दोन वाहने आणि मोबाइल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 24) तापकीरवस्ती, सुसगाव येथे करण्यात आली.
छोटूराम रत्नाराम देवासी (वय 22, रा. हेमराज चौक, कोथरूड. मूळ रा. राजस्थान), रामदेव रत्नाराम सोडा (वय 24, रा. गणराज चौक, बाणेर, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांना माहिती मिळाली की, तापकीरवस्ती, सुसगाव येथे एक ब्रिझा कार (एमएच-12-आरटी-0988) आणि एक बोलेरो पिकअप (एमएच-12-क्यूजी-8316) थांबले असून त्यांच्यात आपसात गुटखा विक्री केला जात आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले. तसेच छोटूराम आणि रामदेव यांना देखील ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा, 13 लाख 16 हजारांच्या दोन गाड्या आणि मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक निरीक्षक सागर काटे, आर एस मुदळ, सहाय्यक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी भालेराव, बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, आतिक शेख, हणमंत कुंभार, सुभाष गुरव, श्रीकांत चव्हाण, पालवे, दत्ता शिंदे, राणे, गुमलाडू यांच्या पथकाने केली.