उपनगरांमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू

पिंपरी – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने विनामास्क व थुंकीबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात व उपनगरांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. परंतु अमलीपदार्थ विरोधी पदथकाचे दुर्लक्ष होत आहे. अशी छुप्यापद्धतीने गुटखा विक्री करणारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनलॉक होऊनही काही उद्योगधंद्यांना सुरू करण्यास अजून परवानगी देण्यात आली नाही. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट, पान टपरी यांचा समावेश आहे. परंतु टपरी बंद असली तरी गुटखा विक्री मात्र शहरात सर्वत्र सर्रास सुरू आहे. बऱ्याच टपरीधारकांनी आपल्या परिसरातील किराणा दुकान, दूध डेअरी, कटिंग दुकानांमधून अमलीपदार्थांची विक्री सुरू केली आहे. 

रुपीनगर, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, भोसरी आदी उपनगरांमध्ये व शहरात छुप्या पद्धतीने सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. परंतु अमली पदार्थविरोधी पथक अथवा पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. संबंधित विभागाने गस्त वाढवून अशा अवैद्य धंद्यांना आळा घालणे गरजेचे आहे. 

केवळ ओळखीच्याच व्यक्‍तींना मिळतो गुटखा
अवैद्य पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा यांची विक्री करणारे व्यावसायिक एक काळजी घेताना दिसून येत आहेत. आपल्या परिसरातील असलेल्या किंवा ओळखीचा व्यक्‍ती असेल तरच या पदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. अनओळखी व्यक्‍ती गुटाखा मागण्यास आला तर नाही म्हणून सांगतात. त्यामुळे असे उद्योग छुप्या पद्धतीने जोरदार सुरू आहेत. त्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.

ग्राहकांची होतेय आर्थिक लूट
अमली पदार्थांवर बंदी असल्याने लपूनछपून विक्री केली जात आहे. त्यामुळे हे पदार्थ जास्तीचे रुपये देऊन खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे यातून एक प्रकारे ग्राहकांची लूट होत आहे. प्रशासनाचे लक्ष नसल्याने असे अवैद्य धंदे शहरात बोकाळू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.