जिनिव्हा, – कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीचे असमान वितरण होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ 10 देशांनी 75 टक्के लसींचे वितरण केले आहे. जगातील सर्व देशांना करोना विरोधी लस लवकरात लवकर मिळायला हवी, अशी मागणीही ग्युटरेज यांनी केली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये बोलताना ग्युटरेज यांनी आपली नाराजी व्यक्त केली. जगातील 130 देशांना करोना विरोधी लसीचा एकही डोस मिळालेला नाही. या कठीण प्रसंगी लसीचे सम प्रमाणात वितरण होणे ही मोठी नैतिक परीक्षा आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर लसीकरण योजना तयार व्हायला हवी. सत्ता असलेल्या देशांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. संशोधक, लस उत्पादक आणि या प्रयत्नांना अर्थसहाय्य करणाऱ्यांनी प्रत्येक देशाला लवकरात लवकर लस मिळेल, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी “जी-20′ गटातील देशांनी तातडीने एक कृती गट स्थापन करायला हवा, अशी सूचनाही ग्युटरेज यांनी केली आहे.
यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सुरक्षित आणि परिणामकारक लसीकरणावर भर दिला होता. मानवी हक्कांचे आणि प्राथमिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करून देशांनी कोविड-19 विरोधी लसीकरण करू नये. तर सर्व देशांना लस उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.