#आठवण: गुरुपौर्णिमा आणि ग्रहण 

नीलिमा पवार 
परवा पौर्णिमा होती. नुसती पौर्णिमा नाही, तर गुरुपौर्णिमा. वर्षात पौर्णिमा 12 असतात. नारळी पौर्णिमा/राखी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा अशा काही पौर्णिमा महत्त्वाच्या असतात, पण गुरुपौर्णिमा अगदी खास महत्त्वाची. गुरूची आठवण करून देणारी, गुरूचा गौरव करण्यसाठी, आपला आदर व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञेपोटी काही तरी करावे अशी भावन आणि संधी निर्माण करणारा हा दिवस.
या दिवशी खास स्मरण होते ते महर्षी व्यासांचे. वेद्‌व्यास हे आद्य गुरू. म्हणून गुरू पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी खास पूजन होते ते दत्तगुरूंचे. दत्तगुरूंनी 24 गुरू केले होते. श्रीमद्‌भगवताच्या अकराव्या स्कंदात त्याची माहिती आहे. त्यांच्या गुरूंमध्ये पृथ्वी, वायू, आकाश, पाणी आणि अग्नी ही पंचतत्त्वे,चंद्रसूर्यासारखे ग्रह तारे आणि हत्तीपासून मुंगीपर्यंत पशुपक्षी यांचा समावेश आहे. थोडक्‍यात, जे जे ज्याच्यापासून शिकायला मिळते त्याला गुरू मानावे. माणूस आयुष्यभर शिकतच असतो. प्रत्येक क्षण हा काहीतरी अनुभवण्याचा आणि अनुभवातून शिकण्याचा असतो. परवा कोणीतरी गमतीने म्हटले, की माणूस आयुष्यभर शिकतच असतो आणि विवाहित पुरुष तर जास्त शिकत असतो. त्याला दोन गुरू असतात. त्यांच्यात स्पर्धा असते, हेवेदावे असतात आणि दुसऱ्याचे शिकवलेले पुसून तेथे आपली शिकवण लादायची असते. त्याची आई म्हणते, तुझी बायको तुला शिकवते आणि बायको म्हण्ते तुमची आई तुम्हाला शिकवते, अर्थात हा गमतीचा भाग झाला.
पण तो प्रत्येक पुरुषाच्या वाट्याला येतो. कसाच चुकत नाही. परवाच्या गुरुपौर्णिमेला ग्रहण होते. चंद्रग्रहण. तेही खंडग्रास आणि सर्वात मोठे. रात्री 11.54 ते पहाटे 3.49 इतका वेळ होते ते. पूर्वी ग्रहण म्हणजे मोठे काही तरी वाटायचे. आमच्या लहानपणी तर राहू-केतू सूर्य चंद्राला गिळायला जातात तेव्हा ग्रहण लागते असे म्हणायचे. आता ग्रहणामागेचे शास्त्रीय कारण अगदी लहान मुलालाही माहिती असते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्याला आपण ग्रहण म्हणतो, इतके ते सोपे आहे. त्यामुळे ग्रहण पाळणे वगैरे प्रकार समाप्त झालेत.
पूर्वी ग्रहण मोठ्या कडकपणे पाळले जायचे, खूप बंधने असायची. उठण्या-बसण्यावर, खाण्या-पिण्यावर, वागण्यावर…अगदी वेध लागल्यापासून ते मोक्ष होईपर्यंत. आता तसले काहीच शिल्लक राहिले नाही. ग्रहण किरकोळ झाले आहे. मात्र आता ग्रहण लागले आहे गुरूला-शिक्षकी पेशाला. परवाच बातमी वाचली. उत्तर प्रदेशात सरकार मागण्या मान्य करत नाही म्हणून 70 दिवस धरणे धरून बसलेल्या शिक्षक मित्रांनी (त्यांच्याकडे शिक्षणमित्र म्हणतात, आपल्याकडे तर त्यांना सेवकच करून टाकले आहे. शिक्षणसेवक.
तुटपुंज्या पगाराचे शिक्षणसेवक आणि हे सरकारचे काम आहे. शिक्षकासारख्या भावी पिढी घडवण्याऱ्या गुरूला सेवक करून राबवून घ्यायचे आणि राजकारण्यांना, खासदारांना-आमदारांना मात्र गडगंज…..संपता संपणार नाही इतके द्यायचे. हे सारे चुकीचे आहे हे समजते पण उमजत नाही. तर गोष्ट अशी-उत्तर प्रदेशातील शेकडो शिक्षणमित्रांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडण करून घेतले. त्यात महिला शिक्षणमित्र होत्या. त्यांचे ते मुंडण केलेले फोटो पाहिले आणि काळीज गलबलून गेले. हे पाहून केवळ गुरुपौर्णिमेच्या चंद्रालाच नाही, गुरूंच्या आयुष्यालाच ग्रहण लागले आहे असे म्हणावे लागते. आणि हे ग्रहण कधी सुटेल याचा भरवसा नाही. सुटण्याची वाट बघण्याशिवाय आपल्या हाती काही नाही.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)