मनुष्यजीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्प बनू शकते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य ईश्वराला प्राप्त करू शकतात; पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरूंनी आपल्या बोधामृताने साधक आणि शिष्य यांचे अज्ञान दूर केल्यावरच त्यांना ईश्वरप्राप्ती होते. प्रस्तुत लेखात आपण ‘संत आणि गुरु’, ‘अविद्यामाया आणि गुरुमाया’, ‘ईश्वर आणि गुरु’, ‘देवता आणि गुरु’, ‘अवतार आणि गुरु’, ‘प्रवचनकार आणि गुरु’, ‘भगत आणि गुरु’, ‘सर्वसाधारण व्यक्ती, साधक आणि गुरु’, ‘शिक्षक आणि गुरु’, असे गुरूंचे इतरांच्या तुलनेतील महत्त्व जाणून घेऊ.

१. संत आणि गुरु

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु केवळ निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्‍यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते; परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच; मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात.

२. अविद्यामाया आणि गुरुमाया

‘मायेचे दोन प्रकार आहेत – एक अविद्यामाया आणि दुसरी गुरुमाया. अविद्यामाया जिवाला अज्ञानात अडकवते, तर गुरुमाया अविद्येतून जिवाची सुटका करते. गुरुमायेलाच ‘प्रभुमाया’ किंवा ‘हरिमाया’ असेही म्हणतात. अविद्यामाया आपल्या मायावी रूपाचा थांगपत्ता लागू देत नाही. एकनाथांसारख्या थोर संतांनाही ‘आपल्या घरी पाणी भरणारा, चंदन उगाळणारा श्रीखंड्या म्हणजे भगवंत आहे’, याचा थांगपत्ता अविद्यामायेमुळेच लागला नव्हता. पुढे द्वारकेहून दुसर्‍या भक्ताच्या रूपात येऊन हरिमायेने त्या अविद्यामायेला दूर केले, तेव्हा श्रीखंड्याचे खरे रूप नाथांना उमजले.’

३. ईश्वर आणि गुरु

अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप आणि ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप.

आ. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की, ती ईश्वरालाच पोहोचते, हे पुढील उदाहरणाहून स्पष्ट होते. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ‘‘ही जागा वामनपंडितासाठी आहे; कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे.’’ हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना; म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले.

पंडित : डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ?
ईश्वर : तो अधिकार गुरूंचा आहे.
पंडित : गुरु कोठे भेटतील ?
ईश्वर : सज्जनगडावर.
त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला.
पंडित : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ?
स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की !
पंडित : मग ईश्वराने ‘डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा’, असे का म्हटले ?
स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला !

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र.

४. शिष्याच्या दृष्टीने ईश्वर आणि गुरु

शिष्याच्या दृष्टीने ईश्वरापेक्षा किंवा देवापेक्षा गुरु श्रेष्ठ होत.
अ. गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।
नमस्कार कोणास आधी करावा ।।
मना माझिया गुरु थोर वाटे ।
तयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ।। – समर्थ रामदासस्वामी
‘गुरुकृपाप्रसाद मिळाल्याविना आपण या भवसागरातून तरून जाऊ शकणार नाही.’

– प.पू. दास (रघुवीर) महाराज, पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग.

आ. गुरु गोविंद दोउ खडे, काके लागूं पाय ।
बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताय ।।
अर्थ : गुरु आणि देव दोन्ही समोर उभे आहेत, मी कोणाला नमस्कार करू ? गुरुदेव, मी आपल्या चरणी नतमस्तक आहे की, तुम्ही माझी देवाशी गाठ घालून दिली.

– संत कबीर

५. देवता आणि गुरु

अ. ‘देवतांकडून भोग (ऋद्धी-सिद्धी) प्राप्त करून घेतल्यास बुद्धी अशुद्ध रहाते. गुरूंकडून मिळवल्यास बुद्धी अशुद्ध न राहिल्यामुळे त्यांचा सदुपयोग होतो. सदुपयोग म्हणजे आपल्या वैभवाचा उपयोग मुमुक्षू, साधक, सिद्ध, अयाचित (न मागता मिळणार्‍या भिक्षेवर उपजीविका करणारे), दीनदुबळे यांच्यासाठी होतो.

आ. देवता लवकर प्रसन्न होत नाहीत. सहसा त्यांना आपली दया येत नाही. गुरूंचे अंतःकरण हे लोण्यापेक्षाही मऊ असल्यामुळे गुरु दयाळू असतात. केवळ ‘आपण दिलेल्या वैभवाचा त्या व्यक्तीकडून सदुपयोग होईल’, अशी त्यांची निश्चिती व्हावी लागते. असे झाले म्हणजे ते मागण्याची वेळ आपल्यावर आणत नाहीत, तर स्वतःहून ते वैभव देतात. असे करतांनासुद्धा ते वैभव न स्वीकारणारा शहाणा शिष्य गुरूंना फार फार आवडतो. मग त्याला ते स्वतःलाच देऊन टाकतात !’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

६. अवतार आणि गुरु

गुरूंचे कार्य बहुधा दोन-चार शिष्यांच्या संदर्भात असते, तर अवतार सर्वसाधारणतः समाजाचे रक्षण अन् धर्मस्थापना यांसाठी असतात. मानवदेह धारण करणारे श्रीराम, श्रीकृष्ण आदी अवतारही गुरुगृही राहिले आणि त्यांनी गुरुसेवा करून गुरुकृपा संपादन केली. हे सर्व अर्थातच इतरांना शिकवण्यासाठी होते.

१०. शिक्षक आणि गुरु

शिक्षक ठराविक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिकवतात, तर गुरु चोवीस घंटे (तास) शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकवण्यापुरताच मर्यादित असतो.

– सुनील ओजाळे,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)