गुरुजी…तुम्ही सुद्धा? गलेलठ्ठ पगार असलेल्या शिक्षकाच्या मुलालाही शिष्यवृत्ती

नियम डावलून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती लाटल्याच्या भानगडी

पुणे – अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ नियम डावलून घेतला जात आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने कमी उत्पन्न दाखवून आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन चौकशीचे सत्र सुरू झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍यातील रेल गावातील उर्दू शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यालाही पात्र नसताना शिष्यवृत्तीचा फायदा मिळवून देण्याचा प्रकार पथकाला पडताळणीत आढळून आला.

शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. पण, संबंधित विद्यार्थ्याचे पालक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असताना त्यांचे वार्षिक उत्पन्न कमी असल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारेच संबंधित विद्यार्थ्याला सन 2019-20 या वर्षातील शिष्यवृत्ती मिळाली. हा प्रकार पुन्हा उघड होईल या भीतीने सन 2020-21 या वर्षात शिष्यवृत्ती अर्जच नोंदवला नसल्याचेही समोर आले आहे.

चौकशी अहवाल त्वरित सादर करा
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बॅंक खात्यात जमा झाली आहे. विद्यार्थ्याचे पालक कोणत्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, त्यांचे वार्षिक उत्पन्न किती, त्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज का भरला याबाबत चौकशी करत अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक तुकाराम सुपे यांनी अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.