निवडीवरून रस्त्यावरच भिडले गुरुजी

गुरुमाऊलीमध्ये फूट; संचालकांना पळवून धक्‍काबुक्‍कीः बॅंकेच्या अध्यक्षपदी अनाप
नगर  – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून सत्ताधारी गुरुमाऊली मंडळात चांगलाच राडा झाला. मंडळात दोन गट पडून संचालकांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. त्यातून भर रस्त्यावर गुरुजी एकमेकांना भिडले. ऐन निवडीच्या तोंडावर माजी अध्यक्ष रावसाहेब रोहकले गटाचे दोन संचालकांनी गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

यामुळे संतप्त झालेले अकोले, संगमनेर, पाथर्डी तालुक्‍यातील रोहकले समर्थकांनी संचालक बाळासाहेब मुखेकर, पाथर्डीचे संचालक अनिल भवार यांना पळविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे संचालकाला दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार भररस्त्यावर घडल्यामुळे शहरांमध्ये पुन्हा गुरुजींच्या राड्याचा जोरदार चर्चा झाली.

जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत तांबे गटाचे साहेबराव अनाम यांना 20 पैकी 12 मते मिळाली तर उपाध्यक्षपदासाठी तांबे गटाचे मुखेकर यांना 20 पैकी 11 मते मिळाली. त्यामुळे हे दोघेही विजयी झाले. या निवडणुकीत रोहकले गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश निंभोरे यांना 8 तर उपाध्यक्षपदाचे उमेदवार मंजूषा नरवडे यांना 9 मते मिळाली. निंभोरे यांचे एक मत कमी मिळाल्याने एक मत फुटले. दुपारी एक वाजता मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडी जाहीर केली.

बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. निवडीपूर्वीच दोन संचालक तांबे, जगताप गटाने पळवून नेले. या संचालकांना बॅंकेच्या खाली आणले. त्यांची समजूत काढण्यात येत असतांना रोहकले गटाच्या संचालकांसह सभासदांनी त्याला आक्षेप घेवून संचालकांना पळवून नेल्याचा आरोप करून त्या दोन संचालकांना धक्‍काबुक्‍की केली. त्यातून तांबे, जगताप व रोहकले हे दोन गट समोरासमोर भिडले. अखेर त्या दोन संचालकांनी तांबे गटाबरोबर राहण्याचा निर्णय जाहीर केल्याने रोहकले गटाचा नाईलाच झाला.

निवडीनंतर माजी अध्यक्ष रोहकले यांनी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, आबासाहेब जगताप यांच्यावर टोकाची टिका केली. ते म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या इतिहासात आजच्या दिवस अत्यंत वाईट आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाच्या संचालक मंडळात फुट पाडत दुसऱ्या उमदेवाराला निवडून आणले. तांबे सोबत गेलेल्या संचालकांनी अक्षम्य वर्तन केले आहे. ते सत्ता आणि पैशाच्या लालसेने एकत्र आले आहेत. विरोधात गेलेले संचालक रोहकले गुरूजींना वडीलांप्रमाणे मान होते. मग या निवडीत विरोधात का गेला? असा सवाल त्यांनी केला.

गुरूमाऊली मंडळ माझे असून पंगत वाढणाऱ्या असे वाटते की जेवणच माझे आहे. संचालक मंडळात दोन गट पाडणाऱ्या शिक्षक सभासद माफ करणार नाही. याच क्षणी गुरूमाऊली मंडळाची कार्यकारिणी, उच्चाधिकार समिती, महिला आघाडी आणि शिक्षक संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा त्यांनी केली. रोहकले यांच्या टीकेला उत्तर देतांना मंडळाचे अध्यक्ष तांबे, नाशिक विभागाचे अध्यक्ष जगताप, समितीचे राज्याचे उपाध्यक्ष कैलास चिंधे यांनी आता बॅंकेतील एकाधिकारशाही संपली आहे. हे संचालक मंडळ सर्वांना विश्‍वासत घेवू काम करणार आहे. रोहकले यांच्या कारभारा कंटाळून काही संचालक आमच्याकडे आले तर त्यांना पळविण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. गुरुमाऊली मंडळाची नोंदणी आपण केलेली असून, त्याचा संस्थापक अध्यक्ष मी असल्याचा दावा तांबे यांनी केला.

महिला आघाडी, उच्चाधिकारी समिती आणि समित्या बरखास्त करण्याचा अधिकार रोहकले यांना नाही. संघाचे राज्याचे अध्यक्ष संभाजीराव थोरात, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, नाशिक विभागाचे अध्यक्ष जगताप यांच्या आदेशानूसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवड करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी रोहकले यांनी संचालक संतोष दुसूंगेंची या अशी अधिकार नसतांना हकालपट्टीची घोषणा केली होती.

आतापर्यंत सेवानिवृत्त झालेले दमा ठुबे, भाऊसाहेब डेरे, सुभाष खोबरे, रावसाहेब सुंभे यांनी शिक्षक बॅंकेत परत कधीही पाऊल ठेवलेले नाही. मग सेवानिवृत्तीनंतर बॅंकेच्या कारभारात रोहकले यांची ढवळाढवळ कशासाठी. संचालक मंडळ आणि गुरूमाऊली मंडळाने चुकीचा कारभार केल्यास त्याला शिक्षक सभासद जाब विचारतील. गेल्या साडेतीन वर्षात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही रोहकले यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला? मग सेवानिवृत्तीनंतर रोहकले यांनी बॅंकेच्या कारभारात हस्तक्षेप थांबवा, असे विठ्ठल फुंदे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.