नवी दिल्ली – गुर्जर समाजाचे नेते किरोरीसिंह बैंसला यांनी आज भारतीय जनतापक्षात प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत किरोरीसिंह आणि त्यांच्या चिरंजीवांनी आज हा पक्ष प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेले दुर्मिळ गुण पाहून आपण पक्ष प्रवेश करीत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की आपण भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहोत. दोन्ही पक्षांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यानंतर आपण भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला आहे. जावडेकर म्हणाले की आज सकाळी किरोरीसिंह यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली. राजस्थानात भाजप दिवसेंदिवस मजबूत होत चालला असून आम्ही तेथील लोकसभेच्या सर्व 25 जागा जिंकू असा विश्वासहीं त्यांनी व्यक्त केला.