गुरुदक्षिणा

पुण्यामध्ये प्रा. ग. प्र. प्रधान नावाचे समाजवादी विचारवंत राहात होते. त्यांना सर्वजण “प्रधान मास्तर’ या नावानेच ओळखत. खरं म्हणजे त्यांचे पूर्ण नाव होते गणेश प्रभाकर प्रधान. गणेश चतुर्थीला त्यांचा जन्म झाला म्हणून आईने लाडाने त्यांचे नाव ठेवले “गणेश’. अशा या प्रधान मास्तरांचा जीवनप्रवास कार्यकर्ता, प्राध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आमदार ते विरोधी पक्षनेता असा आहे. आज प्रधान मास्तर आपल्यात नाहीत. 2009 सालीच ते देवाघरी गेलेत.
2002 सालातील प्रधान मास्तरांची अशीच एक रम्य आठवण! प्रधान मास्तरांना काही लेखन करायचे होते. त्यासाठी शांत ठिकाणची जागा हवी होती. म्हणून ते त्यांचे सहाय्यक चंद्रकांत निवंगुणे यांना म्हणाले, “”अरे चंद्रकांत, तू तुझ्या शेतात घर बांधलंय ना, तिथं मला काही दिवस राहता येईल का?”

“”कशासाठी मास्तर?”
“”अरे, मला काही लेखन, वाचन करायचंय. त्यासाठी शांत ठिकाण हवंय. या पुण्याच्या गोंगाटात शांतता कुठंय? तिथं राहून काही पुस्तकं वाचीन. टिपणं काढीन. चिंतन करीन. काही लेखन करीन. मनाला शांतता पण मिळेल.”
“”पण मास्तर, तिथं वीज कुठंय? विजेसाठी अर्ज केलाय. त्याचं कोटेशन त्यांनी दिलंय. ते आहे साडेतीन लाख रुपयांचं. आता एवढे पैसे मी कुठून भरू?”
त्यावर प्रधान मास्तर गंभीर झाले. विचार करू लागले. आणि एकाएकी म्हणाले, “”माझा एक विद्यार्थी महाराष्ट्र वीज बोर्डात मोठा अधिकारी झालाय. कावळे त्यांचं नाव. मी त्यांना फोन करून काही व्यवस्था होती का ते बघतो.”
एवढं बोलणं झाल्यानंतर काही तासांनी प्रधान मास्तरांनी कावळे साहेबांना मुंबईला फोन लावला. फोन लगेच लागला. मग प्रधान मास्तर कावळेंना म्हणाले, “”अहो कावळे, मी प्रधान मास्तर बोलतोय.”

अत्यंत नम्रपणे कावळे म्हणाले, “”बोला सर. तुमच्या सेवेला तयार आहे.” त्यावर प्रधान मास्तर म्हणाले, “”कावळे, माझे एक सहकारी मित्र आहेत. चंद्रकांत निवंगुणे त्यांचे नाव. त्यांचे पानशेत धरणाच्या परिसरात, आंबी गावाच्या जवळ एक तीन एकराचे शेत आहे. तेथे ते शेती करतात. भातपीक घेतात. शिवाय बांधावर आंबा, चिकू, आवळा, फणस यांचीही झाडे लावलीत. तिथं त्यांनी विहीरही खोदलीय. बोअरवेलही घेतली. त्यावर हापशाचा पंप बसवलाय. तेथे त्यांनी छोटेसे घरही बांधलेय. पण त्या घरात वीज नाही. तिथं जर वीज आली तर आठ दहा दिवस राहीन म्हणतोय. तिथं राहून मला थोडं लेखन करायचंय आणि लेखनासाठी निवांतपणा हवा. तर विजेसाठी काय करता येईल?”

“”सर, मी दोन दिवसांनी पुण्याच्या रास्ता पेठेतल्या कार्यालयात येतोय. तेथे त्यांना पाठवून द्या. सोबत त्या जमिनीचा सातबारा आणायला सांगा आणि विजेची मागणी करणारा अर्ज केला असेल; तर त्याची पोहोच सोबत ठेवायला सांगा.”
गुरू-शिष्याचे संभाषण संपले. ठरल्याप्रमाणे चंद्रकांत निवंगुणे कागदपत्र घेऊन रास्ता पेठेतील कार्यालयात गेले. सोबत कागदपत्रे होती. कावळे साहेबांनी निवंगुणे यांना बोलावून घेतले. त्यांची कागदपत्रे पाहिली. मग ते निवंगुण्यांना म्हणाले, “”तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात. त्यांच्यासाठी विद्युत बोर्डाच्या वेगळ्या योजना आहेत. तुम्ही त्या योजनेखाली का अर्ज केला नाही? त्या योजनेंतर्गत अर्ज केला तर एवढे पैसे भरावे लागणार नाहीत.”

मग कावळे साहेबांनी चिफ इंजिनिअर साहेबांना बोलावून घेतले. आणि दोन दिवसांत त्या शेतावर वीज कशी पोहोचेल यावर चर्चा केली तर चिफ इंजिनिअर म्हणाले, “”यांना दुसरा अर्ज करावा लागेल.”
“”ते आता करतील पुढं?”
“”साहेब, तिथं खांब बसवून देऊ. ताराही ओढू. पण स्वतंत्र डी.पी. बसवावी लागेल. त्यासाठी ट्रक करावा लागेल. वाहतूक खर्च खूप आहे.”
“”तो मी आता मंजूर करतो. तुम्ही तशी कागदपत्रे लगेच तयार करा. इथल्या इथे मान्यता देतो.”
या चर्चेनंतर निवंगुणे यांनी वीज मागणीसाठीचा नवीन अर्ज दिला तो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अर्ज होता. त्यासाठीची कोटेशन फी अत्यल्प होती. ती त्यांनी त्वरित भरली. मग अर्जासोबत त्या जमिनीचा सात-बारा, कोटेशन प्रमाणे पैसे भरल्याची पावती जोडली. अर्ज देऊन, कावळे साहेबांचे आभार मानून निवंगुणे घरी आले.
मग चक्रे त्वरित फिरली. त्या जमिनीवर खांब येऊन पडले. खड्डे खोदून खांब उभे राहिले. तारा ओढल्या गेल्या. नवीन डी.पी. बसवली गेली, शेजारच्या शेतकऱ्यांना निवंगुणे यांचा फोन आला.
“”अहो, तुमच्या शेतात खांब रोवलेत. डी.पी. बसवलीय” त्यावर निवंगुणे म्हणाले,
“”होय, होय. ती सारी कावळे साहेबांची कृपा.” त्यानंतर निवंगुणे यांनी घरातील वायरिंग करून घेतले. मोटरही बसवून घेतली आणि चार दिवसांत घरात वीज खेळू लागली.
अशाप्रकारे कावळे साहेबांनी, एकेकाळच्या फर्गसनच्या प्राध्यापक प्रधानसरांच्या विद्यार्थ्याने, आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आणि गुरुऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. धन्य ते गुरू आणि धन्य तो शिष्य! त्यानंतर प्रधान मास्तर पानशेतजवळच्या त्या शेतावरल्या घरात आठ दिवस जाऊन राहिले. तेथे त्यांनी वाचन, लेखन, चिंतन, मनन केले. मोकळी हवा घेतली. स्वास्थ्य अनुभवले. जीवनातल्या अनुभवांना शब्दबद्ध केले. सेवेला आणि मदतीला चंद्रकांत निवंगुणे होतेच. प्रधान मास्तरांनी तेथे निवांतपणा अनुभवला. लेखक, कवी, विचारवंतांना यापेक्षा वेगळे काय हवे असते? त्यांना अनुभवासाठी जसा लोकांत हवा असतो, तसा लेखनासाठी एकांतही हवा असतो.

डॉ. दिलीप गरूड

Leave A Reply

Your email address will not be published.