गुरूपौर्णिमेनिमित्त फूलबाजाराला ‘बहर’

पुणे – गुरूपौर्णिमा मंगळवारी आहे. या दिवशी पुष्प अथवा पुष्पगुच्छ देऊन गुरूंविषयी आदर व्यक्त केला जातो. त्यामुळे सजावटीसाठी लागणाऱ्या डच गुलाब, जर्बेराला मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मोठी मागणी होती. सोमवारी (दि. 15) येथील बाजारात डच गुलाबाच्या 20 नगांच्या गड्डीला 80 ते 130 रुपये, तर जर्बेराच्या 10 नगांच्या जुडीस 30 ते 40 रुपये भाव मिळाला. यामध्ये, लाल गुलाबाला सर्वाधिक मागणी राहिल्याचे सांगण्यात आले.

गुरूपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेषत: शाळकरी मुले, कॉलेज विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या गुरूजींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून फुलांना पसंती देतात. त्यामुळे दरवर्षी या काळात डच गुलाब आणि जर्बेरा यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. दरम्यान, सोशल मीडियाच्या काळातही फुले देऊन आदर व्यक्त करण्याची प्रथा कायम असल्याचे चित्र बाजारात दिसून येते. लग्नसराईनंतर डच गुलाब आणि जर्बेराला मागणी घटल्याने त्याचे भावही खाली आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या फुलांना चांगली मागणी होत आहे.

किरकोळ बाजारात डच गुलाबाच्या प्रति नगाची 15 ते 20 रुपयांना, तर जर्बेराची 10 रुपयांनी विक्री होत आहे. काही फुलांचा दर्जाही घसरला असून बाजारात फुलांना दर्जानुसार भाव मिळत आहे. आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने फुलांच्या भावात पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील तळेगाव, जातेगाव, वाघापूरमधून सर्वाधिक डच गुलाबांची, तर आळंदी परिसरातून जर्बेराची फुले बाजारात दाखल होत असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here