गुरु हेच परब्रह्म (गुरुपौर्णिमा विशेष)

गुरू बिना ज्ञान नहीं
ज्ञान बिना आत्मा नहीं

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व असते आणि आपल्या हिंदू संस्कृतीत मोठ्या माणसांचा आदर करणे आपल्याला लहानपणापासून शिकविले जाते. ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मराठी महिन्यातील आषाढ मासातील पौर्णिमेला “व्यास पौर्णिमा’ म्हणतात. हीच गुरुपौर्णिमा कारण महर्षी व्यास हे गुरूंचेही गुरू मानले जातात. चारही वेद, अठरा पुराणे, महाभारत आणि भगवद्‌गीता हे भारताची भूषणे आहेत आणि त्यांची निर्मिती जगद्‌गुरू व्यासांनी केली आहे. म्हणून व्यास पौर्णिमा ही “गुरू पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपले आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात. आपले पहिले पाऊल टाकण्यापासून ते पहिल्या शब्दोच्चाराची विद्या आपण त्यांच्याकडून घेतो. तेव्हा सर्वप्रथम त्यांना वंदन करावयाचे. मग लौकिकार्थाने आपण विद्या प्राप्त करतो तेव्हा शाळा, कॉलेज, विद्यापीठे सर्वत्र ज्ञान देण्यासाठी आपल्याला गुरूच लागतात. विषयाचे योग्य ज्ञान आपल्याला हेच गुरू देतात. तेव्हाच आपण आजच्या भाषेत ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, वील, डॉक्‍टर, प्रोफेसर, व्यापारी होऊ शकतो. गुरू पौर्णिमेला गुरूंना वंदन करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याची भारतीय परंपरा आहे. ठिकठिकाणी मोठे उत्सवही साजरे केले जातात.

परंतु, खरं तर आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो आणि कुठल्याही क्षेत्रात काही शिकण्यासाठी गुरूंची गरज असतेच. उत्तम संगीत शिकण्यासाठी, नृत्य शिकण्यासाठी, उत्तम खेळाडू होण्यासाठी, अभिनेता होण्यासाठी गुरूंची गरज लागतेच. नवीन वाहन शिकताना, स्मार्ट फोन वापरताना, संगणक शिकतानाही गुरूंची गरज आहे. फार काय नवीन स्वयंपाक शिकतानाही आईला, बहिणीला, सासूबाईंना दहा वेळा फोन करावा लागतो. नाहीतर आता मोबाईल मदतीला आहेच सर्व गोष्टींसाठी.

गुरू म्हणजे आपल्या जीवनातील अंधकार दूर करणारा. आपले जीवन प्रकाशमय होण्यासाठी धडपडणारा पूर्वीच्या काळी शाळा, महाविद्यालये नव्हती. तेव्हा विद्यार्थी गुरूगृही राहूनच अध्ययन करीत व त्याबरोबर त्यांची सेवाही करीत. हा अध्यनाचा कालावधी अनेक वर्षांचा असे. अशा अनेक गुरू-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. पण एकलव्यासारखा शिष्योत्तम एखादाच. अगदी आजच्या काळातील म्हटले तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी गाणे शिकण्यासाठी गुरूगृही पहाटे उठून पाणी भरण्याचे काम केले तेव्हा संगीतातला “सा’ सुरू झाला. तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकरही आजही त्याचे गूरू आचरेकर सर यांच्या प्रथम पाया पडतो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तर साक्षात गुरू आहेत व तेच परब्रह्मही आहेत. अशा गुरूंना वंदन असो.

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)