नवी दिल्ली : बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येणार आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आपल्या दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, त्याला सोमवारी तीन आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुरुंगातील एका अधिकाऱ्याने राम रहीमची पुढील तीन आठवड्यांसाठी सुटका झाल्याची पुष्टी केली. या काळात डेरा प्रमुखाला त्याच्या गुरुग्राम येथील फार्महाऊसवर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याला सिरसा येथे जाऊ दिले जाणार नाही. “त्याला ७ ते २० फेब्रुवारीपर्यंत फरलो देण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय डेरा प्रमुखाला कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही त्याला गुरुग्राम पोलिसांच्या स्वाधीन करू जे अद्याप रोहतकला पोहोचलेले नाहीत. आम्ही त्याला सायंकाळपर्यंत सोडू,” असे तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी, त्याला त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अनेक वेळा आपत्कालीन पॅरोल देण्यात आले होते, परंतु यावेळी त्याला फरलो मंजूर करण्यात आला आहे. हरियाणाचे मंत्री रणजित सिंह चौटाला म्हणाले की, “कायद्यानुसार फरलो मिळणे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे आणि तोच डेरा प्रमुखालाही लागू करण्यात आला आहे.
तुरुंगातील कैद्यांना पॅरोल किंवा फर्लो मंजूर करण्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. फर्लो हा दोषीचा कायदेशीर अधिकार आहे, जो दोषी ठरल्यानंतर तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पॅरोल/फर्लो मिळविण्यास पात्र ठरतो. इतर कैद्यांप्रमाणे, गुरमीत राम रहीमच्या विनंती अर्जाची देखील अशा प्रकरणांशी निगडित आवश्यक समितीने तपासणी केली आणि त्यांच्या विनंतीला परवानगी देण्यात आली,” असं त्यांनी सांगितलं.