पाटणा – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. यानंतर ते आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी एसके सिंघल यांना बिहारचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.
बिहार निववडणुकीचे बिगुल सध्या वाजले आहेत. अशातच गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.
दरम्यान, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून हा माझा अधिकार आहे. दोन महिन्यांपासून माझे जगणे अवघड होऊन बसलं होतं, मला रोज राजीनाम्याबद्दल फोन येत होते, मात्र मी यावर काही बोललो नव्हतो. आजवर माझ्या निष्पक्षतेवर कुणीही बोट दाखवू शकत नाही. कुण्याही गुन्हेगाराला सोडले नाही आणि निर्दोषांवर अन्याय केला नाही. तसेच माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि सुशांत प्रकरणाचा काही संबंध नाही. मी सुशांतच्या हताश आणि निराश वडिलांची मदत केली, असे स्पष्टीकरणही गुप्तेश्वर पांडे यांनी दिले आहे.
— IPS Gupteshwar Pandey (@ips_gupteshwar) September 22, 2020