बामको – मध्य मालीतील एका गावात बंदुकधाऱ्यांनी 21 गावकऱ्यांची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ओगौसागौ असे या गावाचे नाव आहे. हल्लेखोरांनी गावकऱ्यांवर हल्ला करून त्यांची घरेही जाळली आणि त्यांची जनावरेही त्यांनी पळवून नेली. माली सरकारने या हत्याकांडाचा निषेध केला असून हल्लेखोरांना पकडून कठोर शिक्षा करण्याची घोषणाहीं त्यांनी केली आहे.
माली देशात संयुक्तराष्ट्रांचीही मदत पथके कार्यरत आहेत. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही तेथे सुरक्षा दले पाठवली आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तेथून त्वरीत हलवण्यासाठी हवाईसेवाही तेथे पुरवण्यात आली आहे. संयुक्तराष्ट्रांच्या मालीतील मोहीमेचे प्रमुख महामत सालेह अन्नदीफ यांनी म्हटले आहे की, हल्ल्याचा हा प्रकार अत्यंत भीषण आहे. ते म्हणाले की या देशातील स्थिती सुधारण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करीत आहोत त्याला देशाच्या उत्तरेकडून विधायक प्रतिसाद मिळत असतान मध्य मालीत असा भयानक प्रकार घडणे आमच्यासाठी धक्कादायक आहे.