जळगाव – जळगावमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पराभव झाल्यानंतर सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
गुलाबराव देवकर यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती स्वतः गुलाबराव देवकर यांनी दिली. सोमवारी अजित पवारांची भेट घेणार असल्याची माहिती देखील गुलाबराव देवकरांनी दिली आहे.
अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा सूर हा कार्यकर्त्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. दहा वर्षांपासून विरोधात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले.
त्यामुळे आपण सत्तेची साथ दिली पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना असल्याने याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आपण पक्षात येण्याबाबत चर्चा केली. अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबाबत शरद पवारांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचेही गुलाबराव देवकर यांनी सांगितले.