“ती’ करते अलाहाबादच्या घाटावर अखेरचे क्रियाकर्म

चंद्रशेखर आझाद घाटावरील गुलाब महारजीनची कहाणी

आरती मोने
स्मशानसखी ही एक स्त्री असू शकते हे आपण मान्यच करू शकत नाही. पण उत्तर प्रदेशातील इलाहाबादच्या रसुलाबाद घाटावर अशी एक अविश्वसनीय स्त्री आहे जी मृतांना अग्नि देण्याचं काम गेली अनेक वर्षे करीत आहे. या गुलाबबाईला इथपर्यंत येईपर्यंत मोठा खडतर प्रवास करावा लागला. परंतु तिने निवडलेल्या वेगळया वाटेवर ती एकटी धैर्याने चालत राहिली. अशा असामान्य स्त्रीची गोष्टी मी आज सांगणार आहे.

इलाहाबादच्या फाफामाऊ चिकिया नावाच्या एका अत्यंत खेडेगावात तिचा जन्म झाला. मुलगी झाली की तिला मारूनच टाकायची प्रथाच होती त्यावेळी. पण गुलाबचे वडील वेगळे होते. त्यांनी मुलींना नुसता जन्म दिला नाही तर सन्मानाने वागविले. मुलांप्रमाणे वाढू दिलं आणि हव ते करण्याच स्वातंत्र्य ही दिलं. गुलाब जन्मतःच थोडी आडदांड होती. व्यायाम करायची. स्त्री सुलभ नटणमुरडणं तिला कधी भावलच नाही.

गुलाबचे वडील महापात्र म्हणजे अत्यंविधीचे विधी आणि त्याचे मंत्र मुखोद्गत असणारे मुख्य स्मशान पुरोहित होते. इलाहाबादचा दारागंज घाट हा त्यांचा होता. या घाटावर गुलाबदेखिल वडिलांबरोबर जात असे. त्यावेळी ती सात वर्षांची चिमुरडी होती. तरी तिच लग्न देखिल झाले होतं पण लहान असल्याने ती माहेरी रहात होती.

गुलाब दहा वर्षांची झाल्यावर वयात आली आणि तिची सासरी पाठवणी झाली. सासरी तिचं खेळ, भटकण सार बंद झाले. गरीबा घरची म्हणून सासू, नणंदा, जावा तिच्याशी बोलत ही नसत. सतत हिणवत असत. त्यातच तिला मुलगा झाला आणि थोड्याच दिवसात तिचे वडील अचानक गेले. ती निराधार झाली. वडिलांच्या इच्छेनुसार त्या काळात तिने वडिलांचे अंत्यविधी केले.

वडील गेल्याने घरची परिस्थिती आणखीनच बिघडली. आठ भावंडांना सांभाळ करणे कठिण झाले. शेवटी गुलाबने तो धाडसी निर्णय घेतला आणि अंत्यविधी करण्याचे मनाशी ठरवले. सासरे आधी नाही म्हणाले पण नंतर त्यांनी परवानगी दिली. उपासमारीने रोज मरणाऱ्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी ही 11 वर्षांची पोर हातात एक काठी, स्वरक्षणार्थ आणि तांब्या घेऊन शेवटी घाटावर पोचली आणि इथेच तिचा खडतर प्रवास सुरु झाला.

पंडे मंडळींना तिला पाहून धक्का च बसला. त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. धर्म बुडविलास, नरकात जाशील असे शाप देवू लागले. पण गुलाबचा निश्चय पक्का होता. पहिल्या दिवशी एकटीने हे करताना ती थोडी बिचकली, तिचे हात होरपळले पण ती काम करीत राहिली. घरच्यांनी स्वयंपाक घरात प्रवेशच बंद केला त्यामुळे उपाशीपोटी झोपली. पण ठाम राहिली. आता ती रोजच घाटावर जाऊ लागली. तिथेच रांधून खाऊ लागली. स्मशान हेच तिचे घर झाले. तिला मिळालेला पैसा सासरचे व माहेरचे बिनदिक्कत घेत होते. पडयांनी तिच्यावर मारेकरी ही घातले. अखेर या त्रासाला कंटाळून तिने दारागंज घाट सोडला आणि निर्मनुष्य अशा रसुलाबाद घाटावर तिने स्वतंत्र पणे काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू तिचे बस्तान बसले. लोक तिला अम्मा म्हणू लागले.

तिचे काम दिवसाच्या कुठल्याही वेळेस चालत असे. अगदी चोवीस तासदेखिल. एका दिवसात ती 50-60 प्रेतांना अग्नी देत असे. थकली तर प्रेताला टेकूनच आराम करीत असे… हे ऐकून ही आपण दचकतो.

एखाद्या बाईनं हे काम करताना, प्रतिस्पर्धी म्हणून पंडयांनी दाखविलेला विरोध, या कामामुळे रक्ताची माणसं दुरावण, सासर माहेर सर्वांसाठी कष्ट करूनही कुणीही तिला जवळ केले नाही. तिला चार मुले झाली पण तीदेखिल जवळ राहिली नाहीत. ती भेटायलासुध्दा येत नाहीत. नवरा असून नसल्यासारखा होता. पण तरीही गुलाब डगमगली नाही. वयाची 70 वर्षे स्मशानभूमीत प्रेतांबरोबर वास्तव्य करणे किती भयावह आहे याची कल्पना आपण करू शकत नाही. कारण नुसता स्मशान शब्द उच्चारला तरी आपल्याला भिती वाटते.

अशा वेगळ्या वाटेवर चालणारी गुलाब खरच वेगळी आहे. मुलीचा जन्मच जिथं नाकारला जात होता त्या काळात जन्माला आलेली ही स्त्री स्वतः निवडलेल्या मार्गावर खंबीरपणे चालत रहाते. समाजाशी दोन हात करीत अस्तित्वाचा लढा देते. गुलाबच्या जीवनावर बनलेल्या लघुपटालाही अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.

म्हणूनच प्राचीन काळात जसा स्त्रियांना अधिकार होता म्हणूनच गार्गी, मैत्रेयी, शची अशा विदुषी जन्माला आल्या, तसच तेज, स्वत्व, हिम्मत घेऊन या काळातही गुलाबबाई समोर ठाकते. आणि म्हणूनच म्हणावे वाटते…. गार्गी अजूनही जिवंत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.