अग्रलेख : गुजरातचे धक्‍कातंत्र!

भारतीय जनता पक्षाने आपल्या चौथ्या राज्याचा मुख्यमंत्री बदलला आहे. ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आहे. ज्या राज्यात आपण सत्तेवर आहोत तेथे आपल्याला ऍन्टी इन्कबन्सीचा धक्‍का बसू नये म्हणून घेतली जाणारी ही काळजी आहे, असा सर्वच राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. 

निवडणुका वर्ष-सहा महिन्यांच्या अवधीवर आल्या असताना मुख्यमंत्री बदलला की ऍन्टी इन्कबन्सीचा धोका 50 टक्‍क्‍यांनी कमी होतो अशी एक धारणा तयार झाली आहे. त्याला किती अर्थ असतो हे याचा आज लगेच उलगडा होणार नाही, पण चार राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यामागे निदान हे धोरण असावे, असा अंदाज कोणीही लावू शकतो. कर्नाटक, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री बदलले गेले हे एका प्रक्रियेचा भाग म्हणून लोकांनी स्वीकारले, पण गुजरातमध्ये अचानक करण्यात आलेला सत्ताबदल मात्र मोठीच शॉक ट्रिटमेंट ठरली आहे.

मोदी-शहा यांचे होम स्टेट असलेल्या राज्यात मुख्यमंत्री तसाही नामधारीच असतो. जी काही जादू असते ती मोदी-शहांचीच असते त्यामुळे मुख्यमंत्री कोण हा गुजरातच्या बाबतीत तसा गौण मुद्दा असतो. विजय रूपाणी हे मोदी-शहा यांच्या अत्यंत विश्‍वासातले मुख्यमंत्री होते. 

आनंदीबेन पटेल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची या पदावर अनपेक्षितपणे निवड झाली. त्यांनीही नम्रपणे ही जबाबदारी स्वीकारताना मुख्यमंत्री म्हणून स्वत:चा कधीच बडेजाव माजवला नाही. श्रेष्ठींच्या सेवेत लीन झालेले सेवक अशीच त्यांची एकूण भूमिका राहिली आहे. पण त्यांना असे अचानक बदलण्यात आल्याचा एक थेट अर्थ असा निघतो की गुजरातमध्ये भाजपला आगामी निवडणूक सोपी राहिलेली नाही आणि गुजरातमधील विद्यमान सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात रोष आहे याची नेतृत्व बदल करून भाजप श्रेष्ठींनी दिलेली ही कबुलीच आहे. 

नवीन नेता निश्‍चित व्हायच्या आतच रूपाणी यांना तडकाफडकी पायउतार व्हावे लागले. रूपाणी यांनी राजीनाम्याची घोषणाही अत्यंत शालीनतेने केली. त्यांनी लिहून आणलेले निवेदन पत्रकारांपुढे सादर केले. त्याच्या बाहेर ते एक शब्दही बोलले नाहीत. आपल्या मनात कोणतीही कटुता नाही, हा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेचा व धोरणाचा भाग आहे, असे त्यांनी राजीनाम्याच्या निवेदनात म्हटले आहे. 

त्यांच्या या निष्ठेला दादच द्यावी लागेल. त्यांच्या राजीनाम्यानंतर दोन दिवस अनेक नावांवर चर्चा होत राहिली. पाटीदार समाजाला बरोबर घेतल्याशिवाय राज्यातील निवडणुकीत निभाव लागणार नाही, याची जाणीव भाजप श्रेष्ठींना होतीच. त्यामुळे पाटीदार समाजातला नेताच नवा मुख्यमंत्री असेल असे भाकित वर्तवले गेले. त्यासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव चर्चेत आघाडीवर राहिले. 

त्याखेरीज मांडवीय, रूपाला, प्रफुल्ल खोडा पटेल अशी अन्य नावेही चर्चेत होती. पण नेता निवडीतही भाजप श्रेष्ठींनी धक्‍कातंत्राचा वापर केला आणि त्यांनी भूपेंद्र पटेल हे कोणाच्या ध्यानीमनी नसलेले नाव निश्‍चित केले. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे जर आधी कोणी भाकित केले असते तर लोकांनी त्याला वेड्यात काढले असते इतके हे आश्‍चर्यकारक नाव आहे. 

भूपेंद्र पटेल यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यांना साध्या मंत्रिपदाचाही अनुभव नाही. अहमदाबाद डेव्हलमेंट ऍथॉरिटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे तसेच अहमदाबाद महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांच्या नावावर आहे. ही काही थेट मुख्यमंत्री होण्यासाठीची पात्रता मानता येत नाही. 

निदान गुजरातसारख्या पॉलिटिकली हेवीवेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठीची तर नाहीच नाही. पण तरीही भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणे अत्यंत स्वाभाविक आहे. अर्थात, त्यांच्यावर स्वत:ची कर्तबगारी दाखवून राज्यातील निवडणुका जिंकून देण्याची फारच कमी जबाबदारी असणार आहे. 

मुळात दुसऱ्या कोणी गुजरातमध्ये विजय मिळवून दाखवणे हे मोदी-शहा या नेतृत्वाला मान्य असण्याची शक्‍यताही कमीच आहे. त्यामुळे गुजरातमध्ये जे काही होणार आहे त्याचे सारे कर्ते-करविते मोदी-शहा हेच असणार आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांनी केवळ नामधारी पद्धतीने हा डोलारा तोलून धरायचा आहे. भूपेंद्र पटेल हे काम निश्‍चित पार पाडतील. 

या आधी हेच काम विजय रूपाणी हे करीत होते. पण त्यांना बदलून गुजरातमधील स्थितीत नेमका काय फरक पडेल, हा तेथील सामान्य लोकांपुढील प्रश्‍न आहे. करोनाच्या काळात गुजरातमध्ये नियोजन पूर्ण कोलमडले होते ही वस्तुस्थिती विलंबाने का होईना बाहेर आली आहे. करोना हाताळण्यासाठी गुजरात सरकारने एक भीषण पर्याय अवलंबला होता, त्याचा भंडाफोड भाजपच्याच दोन आमदारांनी केला आहे. 

गुजरातमध्ये करोना पेशंटची संख्या नियंत्रित दिसावी म्हणून तेथे करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासच मनाई करण्यात आली होती, असे म्हणतात. करोनाचे पेशंट रुग्णालयात दाखलच करून घेतले नाही तर करोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसणार नाही आणि अशा रुग्णांना ऑक्‍सिजन वगैरे सुविधा पुरवण्याच्या व्यवस्थेवर अजिबात ताण येणार नाही, असे हे अजब तर्क होते. गुजरातमध्ये त्या निर्णयाची अत्यंत वाईट चर्चा झाली आहे. सोशल मीडियावरही त्यावर सडकून टीका झाली आहे. त्याचे खापर विजय रूपाणींच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या नावावर फुटणार आहे. 

या साऱ्या गडबडीत हार्दिक पटेल यांचे एक ट्विटही बरेच गाजले. त्यांनी या नेतृत्व बदलाचे कारण सांगताना म्हटले आहे की, भाजपने आगामी निवडणुकीच्या संबंधात जो एक गुप्त अंतर्गत सर्व्हे करून घेतला होता त्यात भाजपचा पराभव होणार, असे स्पष्ट संकेत मिळाले होते, त्यामुळे रूपाणींचा तडकाफडकी राजीनामा घेतला गेला असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

हार्दिक पटेल यांच्या या दाव्यात नेमके तथ्य किती हे तेच जाणोत पण काही तरी वेगळा वास भाजप श्रेष्ठींना निश्‍चित आला असणार. त्याशिवाय हे तडकाफडकी मुख्यमंत्री बदलाचे काम झाले नसावे हे मात्र निश्‍चित. असो. पण हा नवा बदल भाजपला किती अनुकूल ठरणार हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच समजेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.