#Prokabaddi2019 : दिल्लीविरुद्ध गुजरातची सरशी

मुंबई – कबड्डीत दोन तुल्यबळ संघ असतील कोणत्याही क्षणाला सामन्याचे पारडे फिरले जाते. गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स संघाने पूर्वार्धातील 11-14 अशी पिछाडी भरून काढीत दबंग दिल्लीवर 31-26 असा शानदार विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये आगेकूच राखली.

गुजरात व दिल्ली हा सामना विलक्षण अटीतटीने खेळला गेला. सामन्याच्या 8 व्या मिनिटाला गुजरातकडे 9-5 अशी आघाडी होती. मात्र, उत्कृष्ट पकडी व खोलवर चढाया करीत दिल्लीने 9-9 अशी बरोबरी केली. पाठोपाठ त्यांनी लोण नोंदवित मध्यंतराला तीन गुणांची आघाडी मिळविली. आघाडी मिळविण्याबरोबरच ती टिकविणेही महत्त्वाचे असते. दिल्लीचे खेळाडू या तंत्रातच कमी पडले. उत्तरार्धात शेवटची 9 मिनिटे बाकी असताना 20-20 अशी बरोबरी होती. त्यावेळी सामन्यात कोण विजयी होणार याचा अंदाज करणे कठीण होते.

दोन्ही संघांच्या चाहत्यांमधील उत्कंठा शिगेस पोहोचली होती, त्यांना चढाया व पकडींवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत गुजरातच्या खेळाडूंनी सामन्यास कलाटणी दिली. त्यांनी जोरदार चढाया केल्या पण त्याचबरोबर त्यांनी अचूक पकडीही केल्या. तेथून त्यांनी खेळावर पकड घेतली. त्याचे श्रेय जी.बी.मोरे (9 गुण), रोहित गुलिया (8) व सचिनकुमार (4) यांच्या उल्लेखनीय खेळास द्यावे लागेल. दिल्लीच्या नवीनकुमारने 10 गुणांची कमाई करीत सुपरटेनची कामगिरी केली. चंद्रन रणजितने 5 गुण मिळविले. त्यांच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.