फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा
पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत गुजरातच्या वैदेही चौधरी हिने बेंगळुरूच्या सोहा सादिकचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या एकतर्फी झालेल्या लढतीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या गुजरातच्या वैदेही चौधरी हिने बेंगळूरच्या सोहा सादिकविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. हा सामना 1 तास 39 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये वैदेहीने अधिक भक्कम सुरुवात करत तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सोहाची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
दुसऱ्या सेटमध्ये वैदेहीने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवला. वैदेहीने बॅंकहॅंड व फोरहॅन्डचा सुरेख संगम साधत पहिल्याच गेममध्ये सोहाची सर्व्हिस रोखली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या सोहाला शेवटपर्यंत सुर गवसला नाही. वैदेहीने सोहाची पुन्हा एकदा पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून विजेतेदावर आपले नाव कोरले. वैदेही हि गुजरात येथे अल्तवॉल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक जिग्नेश रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना वैदेही चौधरी म्हणाली की, सोहविरुद्ध याआधी मी 2-3वेळा खेळले असून दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. पण आजच्या अंतिम फेरीच्या लढतीत मी सोहाविरुद्ध वरचढ खेळ केला आणि बॅंकहॅंड व फोरहॅन्डचा सुरेख वापर केला. तसेच, कालच्या सामन्यात अव्वल मानांकित खेळाडूंविरुद्ध विजय मिळविल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला होता.
स्पर्धेतील विजेत्या वैदेही चौधरीला 31500रुपये व 40 गुण, तर उपविजेत्या सोहा सादिकला 21000रुपये व 25 गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फिनआयक्युचे योगेश कारवा, सुशील जोसेफ आणि स्पर्धा संचालक नवनाथ शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेट्रोसिटीचे सुधीर धावडे, प्रणिल धनवे आणि सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सविस्तर निकाल :
अंतिम फेरी – वैदेही चौधरी (भारत) वि.वि. सोहा सादिक (भारत) 6-2, 6-1.