गुजराती कांदा बेचव; पुणेकरांची पाठ

स्थानिक कांद्याला पुन्हा मागणी

पुणे – गुजरात येथून आलेल्या कांद्याकडे घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांनी फिरवलेली पाठ…लॉकडाऊन लागण्याची शक्‍यता कमी झाल्यामुळे मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे रविवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे 4 रुपयांनी, तर शुक्रवारच्या (दि.26) तुलनेत 6 रुपयांनी वाढ झाली आहे.

स्थानिक कांद्याला घाऊक बाजारात दर्जानुसार किलोस 25 ते 29 रुपये भाव मिळत आहे. तर, गुजराती कांद्याला 10 ते 15 रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारात स्थानिक कांद्याला किलोस प्रतवारीनुसार 40 ते 60 रुपये भाव मिळत आहे. गुजराथच्या पांढऱ्या कांद्यास 30 ते 40 रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटनेचे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

गुजराती पांढऱ्या कांद्याविषयी रितेश पोमण म्हणाले, “मागील तीन आठवड्यापासून या कांद्याची आवक होत आहे. मात्र, ग्रेव्ही तयार होत नसल्याने हॉटेल विक्रेते हा कांदा खरेदी करत नाहीत. केवळ स्वस्त मिळतोय म्हणून काही ग्राहक खरेदी करतात. सध्या स्थानिक कांद्याचा गरवीचा हंगाम सुरू आहे. पुरंदर, शिरूर, हवेली, खेड, मंचर, राजगुरूगनगर, जुन्नर, दौंड भागातून मार्केट यार्डात कांद्याची आवक होत आहे.

…म्हणून भाव घसरले
मागील आठवड्यात गुजरातच्या कांद्याची झालेली आवक, हवामानातील बदल आणि लॉकडाऊन लागेल, बाजार समित्या बंद होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस बाजारात आणला. दररोज सुमारे 100 गाड्यांची आवक होती. होणाऱ्या आवकमध्ये अपरिपक्व आणि कच्चा कांद्याचे प्रमाणही होते. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले होते. शुक्रवारी (दि. 26) कांद्यास 20 ते 23 रुपये भाव मिळत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.