अहमदाबाद – गुजरातमधील ज्येष्ठ नेते जयराजसिंह परमार यांनी कॉंग्रेसचा हात सोडून मंगळवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या परमार यांनी 17 फेब्रुवारीला पक्षाला रामराम ठोकला. ते तब्बल 37 वर्षे कॉंग्रेसमध्ये कार्यरत राहिले.
कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावर टीकास्त्र सोडले होते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागूनही प्रत्येक वेळी डावलण्यात आल्याविषयीची नाराजीही त्यांनी त्यावेळी उघड केली.
कॉंग्रेसमध्ये दुर्लक्षित केले जात असल्याने पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता चालू वर्षीच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यावेळी परमार यांना भाजपची उमेदवारी मिळणार का याविषयी उत्सुकता असेल.