नवी दिल्ली – गुजरात विधानसभेतील राज्यसभेत निवडून द्यायच्या दोन जागांसाठी दोन वेगवेगळ्या दिवशी निवडणूक घेण्याऐवजी एकाच दिवशी या दोन्ही निवडणुका घ्या अशी मागणी करणारी कॉंग्रेसची याचिका स्वीकारण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे. सुटीकालीन खंडपीठाचे न्यायाधिश संजीव खन्ना आणि न्या बी. आर,. गवई यांच्या पुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती. पण ती त्यांनी अमान्य केली.
निवडणुक झाल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका तुम्ही सादर करू शकता असे नमूद करीत त्यांनी ती याचिका विचारार्थ घेण्यास नकार दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
त्या दोन्ही जागांवर एकाच वेळी निवडणूक घेतल्यास त्यातील एक जागा कॉंग्रेसला मिळू शकते म्हणून भाजपने या दोन जागांच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याला गुजरात विधानसभेतील कॉंग्रेसचे नेते परेशभाई धनानी यांनी आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती.