विकासाच्या गुजरात मॉडेलचा फुगा फुटला – शिवसेना

मुंबई –विकासाच्या गुजरात मॉडेलचा फुगा फुटला आहे. ते राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते; तर मग रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली, असा सवाल शिवसेनेने केला आहे. भाजपशासित गुजरातमध्ये नुकताच तडकाफडकी आणि अनपेक्षित नेतृत्वबदल झाला. मुख्यमंत्रिपदावरून विजय रूपाणी पायउतार झाले. 

त्यांच्या जागी प्रथमच आमदार बनलेल्या भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली. त्या घडामोडींचा संदर्भ घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदी पटेल यांची निवड सत्तारूढ भाजपच्या आमदारांकडून एकमताने झाली. पण, पटेल यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. मागील चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले, अशी खिल्ली अग्रलेखातून उडवण्यात आली आहे.

भाजपने काही दिवसांपूर्वी कर्नाटक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले. कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते. पण, एखादे राज्य जेव्हा विकासाचे मॉडेल असल्याचे आदळआपट करत सांगितले जाते; तेव्हा अचानक नेतृत्वबदलाने लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. गुजरातमध्ये करोना संकटकाळात सरकारी यंत्रणा साफ कोलमडली. त्या राज्यात अनेक मोठे उद्योग बंद पडत आहेत.

 गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आक्रोश करत आहेत. त्या संतापाचा फटका निवडणुकांत बसेल याची जाणीव झाल्याने नेतृत्वबदल झाला, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे. गुजरातमधील घडामोडींवर भाष्य करून शिवसेनेने एकप्रकारे भाजपला डिवचल्याचे मानले जात आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.