सातारा – गुजरातमधील फूड कंपनीच्या उत्पादनांची नक्कल करून तयार केलेले उत्पादन विकून 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल झाकीर सिकंदर बागवान (रा. नेले, ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुजरातमधील एस. एस. फूड्स ही कंपनी “लंच बॉक्स’ नावाने स्नॅक्स उत्पादने तयार करते. ही कंपनी महाराष्ट्रात आपली उत्पादने कायदेशीररित्या विकत आहे. या कंपनीच्या उत्पादनांची नक्कल करून झाकीर बागवान हा नेले येथे एस. एस. गृह उद्योग या नावाने “लच का बॉक्स’ ब्रॅंडने स्नॅक्सची उत्पादने तयार करून विकत होता.
तो आपल्या कंपनीच्या नावाची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे गुजरातमधील कंपनीचे वितरण व्यवस्थापक विजय विष्णू लालवाणी (रा. युवन सोसायटी, उनगम, चौरियासी, सूरत, गुजरात) यांना समजले. बागवान याने कंपनीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद लालवाणी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून हवालदार एस. बी. भोसले तपास करत आहेत.