नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या विस्तारावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या गुजरात येथील मुंजापारा महेंद्रभाई यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे महिला-बालकल्याण व आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.
महेंद्रभाई यांनी आज महिला-बालकल्याण व आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
यावेळी बोलताना महेंद्रभाई यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला, कोणत्याही आव्हानाचा सामना करायला शिकवलं आहे. देशात नागरिकांनी करोना काढा घेतल्याने रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली होती. होमिओपॅथी, मोदींचा योग यांचा रुग्णांना करोनापासून वाचवण्यामध्ये मोठा हातभार आहे. एवढंच काय तर विरोधी पक्षाचे सदस्यही माझ्याकडून औषध घेतात.” असा दावा केला.
दरम्यान, गेल्या तीन दशकांपासून महेंद्रभाई हे हृदयरोग तज्ज्ञ व गुजरात येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
५२ वर्षीय महेंद्रभाई यांनी राज्यभरातील विविध वैद्यकीय शिबिरांमध्ये आतापर्यंत ८ लाख रुग्णांना सेवा दिली आहे. विशेष म्हणजे औषधांसाठी ते रुग्णांकडून केवळ २ रुपये घेत.