अहमदाबाद – गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी 330 जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या 238 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते.
यावेळी गुजरातमध्ये एकूण 1 हजार 621 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्यापैकी सुमारे 20 टक्के जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये आपच्या सर्वांधिक 61 उमेदवारांचा समावेश आहे. कॉंग्रेसच्या 60, तर भाजपच्या 32 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
330 पैकी 192 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न आदी आरोपांचा समावेश आहे. आपच्याच सर्वांधिक 43 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एका अहवालात संबंधित माहिती दिली आहे.
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. सत्तारूढ भाजप सर्व जागा लढवत आहे. त्याखालोखाल आपने 181, तर कॉंग्रेसने 179 उमेदवार दिले आहेत. गुजरात निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यांत मतदान होईल.